पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मनीषा मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात त्यांची दिल्लीत चौकशी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली. या प्रकरणात मांढरेला रविवारी दिल्लीतील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपअधीक्षक पवन कुमार यांनी मांढरे हिला विशेष न्यायाधीश रश्मी कुजूर यांच्या न्यायालयात रविवारी हजर केले.
‘सीबीआय’कडून ॲड. व्ही. के. पाठक आणि दर्शन लाल यांनी बाजू मांडली. ‘ या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, तसेच ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणात आरोपींनी संगनमत केले. आरोपी मांढरे ही परीक्षाप्रकियेशी (एनटीए) संबंधित आहे. विशेष मार्गदर्शनाच्या नावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. परीक्षेतील प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती त्यांना विद्यार्थ्यांना दिली हाेती. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, ‘नीट’ प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. आरोपींची एकत्र चौकशी करायची आहे. तपासासाठी चौदा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी,‘ अशी विनंती ॲड. पाठक आणि ॲड. लाल यांनी यु्क्तिवादात केली. ‘सीबीआय’च्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश रश्मी कुजूर यांनी मांढरेला चौदा दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी रसायनशास्त्राचा अध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची ‘सीबीआय’च्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरेही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ‘सीबीआय’ने तिला अटक केली. यापूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. ‘सीबीआय’ने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
