पुणे :  ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील जीवशास्त्राची अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरेला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केली. मांढरे परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात  सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती ‘सीबीआय’कडून देण्यात आली. मनीषा मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे.

या प्रकरणात त्यांची दिल्लीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती ‘सीबीआय’कडून देण्यात आली.

 ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी रसायनशास्त्राचा अध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची ‘सीबीआय’च्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरेही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ‘सीबीआय’ने तिला अटक केली.  ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतले. लोखंडे हा पुण्यातील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणार्‍या एका विद्याथ्र्याला पुणे पोलिसांनी बुधवारी (१३ मे) ताब्यात घेतले.  ‘सीबीआय’ने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुलकर्णी, वाघमारे यांची कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून त्यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सीबीआय’कडून देण्यात आली.

वाघमारेच्या पतीची चौकशी

या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा वाघमारेचा पती दंतवैद्य आहे. त्याचे बिबवेवाडीत रुग्णालय आहे. ‘सीबीआय’च्या पथकाने वाघमारेच्या पतीच्या रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालय बंद असल्याचे निदर्शनास आले. वाघमारेच्या डॉक्टर पतीची या प्रकरणात ‘सीबीआय’कडून चौकशी करण्यात येणार आहे.

 ‘अध्यापिकेवर महाविद्यालयाकडूनही लवकरच कारवाई ’ 

‘मनीषा मांढरे पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयात २००२पासून कार्यरत आहेत. गेली २४ वर्षे इयत्ता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्या जीवशास्त्राचे अध्यापन करतात.  अनुभव लक्षात घेऊन ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने ‘नीट’ परीक्षेसंदर्भातील गोपनीय कामकाजासाठी  नियुक्ती केली होती. संबंधित व्यक्ती आणि एनटीए यांच्यातील पत्रव्यवहार, सूचनांची देवाणघेवाण थेट त्यांच्या स्तरावर होते. त्यामुळे या प्रक्रियेशी महाविद्यालय प्रशासन अथवा संस्थेचा संबंध नाही. मांढरेला अटक झाल्याची बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची संस्था आणि महाविद्यालय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१’ कायद्यातील तरतुदींनुसार संबंधित शिक्षिकेविरोधात आवश्यक ती चौकशी प्रक्रिया राबवण्यात येईल. तसेच, नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी दिले.

‘राष्ट्रीय परीक्षा संस्था विसर्जित करा’

नीट-युजी पेपर फुटीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एसटीए) विसर्जित करण्याची मागणी दि युनायटेड डॉक्सर्स फ्रंट (यूडीएफ) या डॉक्टरांच्या संघटनेने शनिवारी केली. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परीक्षा घेताना होणारे घोटाळे पाहता या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदलांची गरज व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत तसेच याा संस्थेला व्यापक अधिकार देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दोन सहसचिवांची नियुक्ती

राष्ट्रीय परीक्षा संस्थेत दोन सहसचिव आणि सहसंचालकांची नियुक्ती केंद्राने केली आहे. त्यात भारतीय सांख्यिकी सेवेतील १९९८ च्या तुकडीतील अधिकारी अनुजा बापट व २००४ च्या तुकडीतील भारतीय महसूल सेवेतील अधिकारी रुचिता विज यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कालावधी पाच वर्षे असेल. याखेरीज भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आकाश जैन व भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकारी आदित्य राजेंद्र भोजगढीया यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.