पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा. मोटेगावकर याला नऊ दिवस ‘सीबीआय’ कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.

‘पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर याची रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी पी. व्ही. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित होता. प्रा. मोटेगावकर याचे लातूरमधील कार्यालय, तसेच निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. तेव्हा रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नसंच सापडले. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न ३ मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेत होते. पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अटक करण्यात आली‘, अशी माहिती ‘सीबीआय’कडून देण्यात आली.
प्रा. मोटेगावकर याची रविवारी पुण्यातील ‘सीबीआय’ कार्यालयात चौकशी करण्यात आली. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने ‘सीबीआय’च्या पथकाने लातूरमध्ये ‘आरसीसी क्लासेस’चे कार्यालय आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी छापे टाकले. तेथे शोधमोहीम राबविली. प्रा. मोटेगावकर याचे कार्यालय, निवासस्थानातून कागदपत्रे, लॅपटाॅप, मोबाइल संच जप्त करण्यात आले, असे ‘सीबीआय’च्या अधिकााऱ्यांनी सांगितले.

प्रा. मोटेगावकर याला अटक करण्यात आल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. प्रा. मोटेगावकर याचे कार्यालय आणि निवासस्थानातून कागदपत्रे, लॅपटाॅप, मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे आहेत. इलेक्ट्राॅनिक उपकरणाची तांत्रिक तपासणी करायची आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. तपासासाठी मोेटेगावकर याला ‘सीबीआय’ कोठडी देण्यात यावी, अशी विनंती ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केली. या प्रकरणात अटक करण्यत आलेल्या मोटेगावकर याची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली असून, पुढील तपासासाठी मोटेगावकर याला तपासासाठी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात नेण्यात येणार आहे.

जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अटक करण्यात आली. दिल्लीतील विशेष न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मनीषा मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्यूटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली. या प्रकणात मुख्य सूत्रधार लातूरमधील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यालाही अटक करण्यात आली. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित असल्याचे तपासात उघडकीस आले हाेते. प्रा. मोटेगावकर आणि प्रा. कुलकर्णी हे मूळचे लातूरचे आहेत.

आतापर्यंत दहा आरोपी अटकेत

‘सीबीआय’ने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर परिसरातून आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दहा आरोपी अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘सीबीआय’ने दिली आहे.