पुणे : ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणातील १३ आरोपींविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) १३ आरोपींविरुद्ध दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी हे कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
‘या प्रकरणात परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित विषय तज्ज्ञ, मध्यस्थ, शिकवणी वर्गाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने नोंदविली होती. त्यानंतर हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले. सीबीआयच्या पुणे, लातूर, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशभरात छापे टाकून आरोपींना अटक केली. या कारवाईत लॅपटाॅप, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली. आरोपींकडून जप्त केलेल्या लॅपटाॅप, संगणक, मोबाइल संच अशा साधनांची पडताळणी करण्यात आली. तपासात परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे’, अशी माहिती ‘सीबीआय’ने दिली आहे.
पेपरफुटी प्रकरणातून पुण्यातून परीक्षा प्रक्रियेतील विषय तज्ज्ञ मनीषा मांढरे, लातूरहून प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा हवालदार, शिकवणी वर्ग संचालक शिवराज मोटेगावकर, प्रा. तेजस शहा, तसेच मध्यस्थ डाॅ. मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली होती.
‘सीबीआय’च्या आरोपपत्रात काय ?
‘आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, पुरावा नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून ३६० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पेपरफुटीच्या अनुषंगाने ४२२ पुरावे दिल्लीतील विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. आरोपींकडून इलेक्ट्राॅनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत’, असे ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
