पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची (नीट-यूजी) फेरपरीक्षा उद्या (२१ जून) देशभरात आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ‘भिंतीवरील घड्याळ’ अनिवार्य करण्यात आले आहे.

‘एनटीए’तर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी चौकशी करत सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पेपरफुटीमुळे पुन्हा अभ्यास करून फेर परीक्षा देण्याची वेळ देशभरातील लाखो विद्यार्थ्यांवर आली आहे. रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका वायूदलाने परीक्षा केंद्रावर पोहोचवल्या आहेत. तसेच अन्य अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देशभरातील २२ लाख ७९ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत.

फेरपरीक्षेसाठी वाढीव वेळ

फेरपरीक्षा वेळ दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे. उमेदवारांना १५ मिनिटे वाढवून देण्यात आला आहे. तर दिव्यांग उमेदवारांना ६:२० वाजेपर्यंतची वेळ दिली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी १.२० या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. दुपारी १.३० नंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. बायोमेट्रिक पडताळणीत तांत्रिक अडचण आल्यास लेखी हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.

पर्यवेक्षकीय मनुष्यबळात वाढ

फेरपरीक्षा देशभरातील ५५१ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. निष्पक्ष देखरेखीसाठी ६६६९ स्वतंत्र निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मे महिन्यातील परीक्षेवेळी ६ हजार निरीक्षक नियुक्त करण्यात आले होते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परीक्षेवर देखरेख

फेरपरीक्षेबाबत एनटीएने प्रसिद्ध केल्या प्रसिद्धिपत्रकावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (एनएमसी) बोधचिन्ह आणि नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेवर वैद्यकीय आयोगाची थेट देखरेख असल्याचे अधोरेखित होते.

​परीक्षा केंद्रांवर ‘भिंतीवरील घड्याळ’ अनिवार्य

​उमेदवारांना वेळेचे नियोजन नीट करता येण्यासाठी फेरपरीक्षेच्या नियमावलीत एक नवीन सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. आता प्रत्येक परीक्षा कक्षात भिंतीवरील घड्याळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तक्रारींसाठी नवीन संकेतस्थळ

फेरपरीक्षेदरम्यान उमेदवारांना किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा गैरप्रकारांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी एनटीएने नव्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. ‘innovateindia.mygov.in/neet-ug-2026’ या दुव्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.