पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी राष्ट्रीय चाचणी संचलन संस्थेतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट-यूजी फेरपरीक्षेचा निकालात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील श्रावणी कृष्णा कुदळे या विद्यार्थिनीने दमदार कामगिरी केली. श्रावणीने देशात पाचवा, मुलींमध्ये देशांत पहिला आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रावणीला ७२० पैकी ७१० गुण मिळाले आहेत. पेपरफुटीमुळे खचून न जाता मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा तिने अभ्यासासाठी वापर करून यश मिळवले.
एनटीएतर्फे मेमध्ये घेण्यात आलेली परीक्षा पेपरफटीमुळे रद्द करावी लागली. त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. देशभरातील ५५१ शहरातील ५४४० परीक्षा केंद्रांवर १३ भाषांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आला. सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षेतून ११.२१ लाख विद्यार्थी विविध वैदकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक मुली आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी या गावच्या श्रावणी कुदळे या विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशामुळे छोट्या गावांमध्येही असलेली गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. श्रावणीचेही प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतनमध्ये, तर अकरावी-बारावीचे शिक्षण लडकत स्कूलमध्ये झाले. तिने नीटच्या तयारीसाठी खासगी शिकवणीही लावली होती. पेपरफुटीमुळे खचून न जाता सातत्याने अभ्यास करून श्रावणीने या परीक्षेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संंपादन केले.
नीटच्या तयारीसाठी खासगी शिकवणी लावली होती. दिवसभरात किमान सहा तास स्वयंअध्ययन करत होते. प्रामुख्याने संकल्पना समजून घेण्यावर भर दिला होता. पेपरफुटीमुळे सुरुवातीला वाईट वाटले. पण त्याकडे संधी म्हणून पाहायचे ठरवले. मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करून अधिक नेटाने अभ्यास केला. सातत्यपूर्ण अभ्यास आणि निश्चित ध्येय ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळवता येते. – श्रावणी कुदळे, नीट परीक्षेत देशात पाचवी, मुलींमध्ये आणि राज्यात पहिली
राज्यातील गुणवंत
नीट परीक्षेत ६८०पेक्षा अधिक गुण मिळवलेले देशभरातील १३८ विद्यार्थी आहेत. त्यात देशात पाचवी आणि राज्यात पहिली आलेल्या श्रावणी कदळेसह आणखी काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मोहनसिंह भोसले याने १०वा, सार्थक पाटीलने १४वा, सान्निध्य डोंगरेने २८वा, अर्णव लाहोटीने ३२वा, प्रणव टेंभुर्णेने ३३वा, रौश्मित गुप्ताने ३४वा, सोहम पाटीलने ५३वा, सागर कारीकरने ६७वा, सौम्या बडोलेने ७७वा, अनुश्री थोरातने ८५वा, आर्या दिवेकरने ९०वा, सहीम पटवेगारने १०६, सुहान शेखने ११६वा, अमीर वारावालाने ११९वा, सार्थक पेठकरने १२०, श्रीवल्लभ गावडेने १२२वा, तर गोपाळ पाटीलने १३७वा क्रमांक मिळवला आहे.
