गणेशोत्सवात महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेत असताना, स्वच्छताविषयक कामात कुचराई केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पिंपरीतील विसर्जन घाटावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी सकाळपासूनच प्रमुख गणेश विसर्जन घाटांची तसेच कृत्रिम विसर्जन हौदांची पाहणी केली.

वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट, चिंचवडगाव-थेरगाव पूल घाट, पिंपरीतील सुभाषनगर घाट, वाकड विसर्जन घाट, सांगवी घाट, मोशी घाट व खाणीचा यात समावेश होता.अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता संजय खाबडे, संजय कुलकर्णी, डॉ. ज्ञानदेव जुंधारे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल आदी या दौऱ्यात सहभागी होते. पिंपरीतील घाटावर आयुक्त आले असता, नदीत गाळ साचल्याचे दिसून आले.

हेही वाचा : म्हाळुंगे-माण नगररचना योजनेच्या कामाला गती ; पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची स्थळपाहणी

त्या ठिकाणी दुर्गंधी येत होती. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. तातडीने स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.या दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गणेश विसर्जन घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावावेत.

हेही वाचा : पुणे : पुरंदर विमानतळाची भूसंपादन अधिसूचना लवकरच; मोबदल्याचे पर्यायही निश्चित होण्याच्या मार्गावर

विसर्जन घाटांवरील निर्माल्यकुंडांची ठिकाणे निश्चित करून तसे फलक लावावेत. जीवरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावा. अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करावी. विसर्जन घाटांवरील अपूर्ण कामे पूर्ण करावीत. पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले.