गणेशोत्सवात मध्य भागांत वाहने न आणण्याच्या पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष

गणेशोत्सवाच्या काळात मध्य भागात शक्यतो मोटारी घेऊन येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असतानाच ओला, उबरचालकांकडून  प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे.  मध्य भागातील अरुंद रस्त्यांवर गर्दीच्या वेळेत ‘अ‍ॅप’आधारित ओला, उबरचालक प्रवासी वाहतूक करत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

मध्य भागात अनेक प्रमुख गणेशोत्सव मंडळे आहेत. मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली असून, गौरी विसर्जनानंतर पुढील पाच दिवस गर्दीत वाढ होणार आहे. या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून मध्य भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. मात्र, मुख्य रस्त्यांलगत असलेले उपरस्ते बंद न केल्याने या भागात ओला, उबर चालक तसेच नागरिक मोटारी घेऊन येत असल्याने कोंडीत भर पडत आहेत. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ तसेच कसबा पेठ भागातील गल्लीबोळातून मोटारचालक वाट काढतात. संध्याकाळनंतर या भागात देखावे पाहण्यासाठी गर्दी होते. गर्दीतून वाट काढणारे मोटारचालक, दुचाकीस्वार तसेच देखावे पाहणाऱ्यांच्या गर्दीमुळे चिंचोळय़ा रस्त्यांवर मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक जण सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. त्यांच्याबरोबर लहान मुले असतात. गल्लीबोळातून सुरू असलेल्या वाहतुकीत एखादी मोटार शिरल्यानंतर गोंधळ उडतो.

पुण्यातील गणेशोत्सवात खास परगावातील नागरिक मोठय़ा संख्येने येतात. उपनगरात राहणारे अनेक जण ओला, उबरमधून पाहुण्यांसह मध्य भागात देखावे पाहण्यासाठी येतात. ओला, उबर चालकाला मध्यभागातील परिस्थिती तसेच तेथील रस्त्यांची माहिती नसल्याने थेट गर्दीत मोटार शिरते आणि कोंडीत भर पडते. अशा वेळी वादावादीचे प्रसंग उद्भवतात. वाहतूक पोलिसांनी नदीपात्रातील रस्ते, कुंभारवाडा भागात मोटार लावून मध्य भागात येण्याचे आवाहन केले असताना अनेक जण उपरस्त्याने किंवा गल्लीबोळातून मोटारी  घेऊन येत असतात.

सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

मध्य भागात येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने नदीपात्रातील रस्त्यावर (जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल) लावावीत. मध्य भागात शक्यतो चारचाकी वाहने आणू नका. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच वादही घालू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

गणेशोत्सवात वाहने लावण्याची सुविधा

स. प. महाविद्यालय, रानडे बालक विद्या मंदिर, नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ (दुचाकी आणि चारचाकींसाठी) कुंभार वेस, गणेश पेठ दूधभट्टी, स्वारगेट धोबी घाट, पूरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूला, हमालवाडा नारायण पेठ वाहनतळ, एसएसपीएमएस शाळा, एच. व्ही. देसाई महाविद्यालय (दुचाकींसाठी), पुलाची वाडी नदीपात्रातील रस्ता, काँग्रेस भवन, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, संजीवन हॉस्पिटल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकीसाठी).