पुणे : देशाच्या प्रत्येक राज्यात महाविद्यालये, विद्यापीठांच्या खानावळीतील जेवण, शिष्यवृत्ती, पेपरफुटी अशा अनेक मुद्द्यांवर आंदोलने सुरू आहेत. देशभरातील विद्यार्थी देशाचे राजकारण बदलत आहेत, अशी भूमिका ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी मांडली. आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार नाही असे आश्वासन सरकारने देऊनही गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबरला होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनात सहभागी होऊन नेहा बोरा यांनी उपोषण केले होते. या आंदोलनामुळे बोरा देशभरात फिरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. विद्यापीठ विद्यार्थी कृती संघर्ष समितीचे राहुल ससाणे, नितीन आंधळे, अभिषेक शेलकर, राहुल गायकवाड, सीमा वानखेडे या वेळी उपस्थित होते.

बोरा म्हणाल्या, ‘आंदोलन केवळ संसदेत बसलेल्या लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नाही, तर घराघरांमध्ये, चहाच्या टपऱ्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये बदल घडवण्यासाठी आहे. संपूर्ण व्यवस्थेत सुधारणेची गरज आहे. संसदीय बदलासोबतच द्वेषाचे राजकारण संपुष्टात आणून ऐक्याचे राजकारण निर्माण होणे आवश्यक आहे. हा देश खूप मोठा आहे आणि सरकारमधील लोकांनी मोठी फूट पाडली आहे. ही फूट संपून लोकांनी संघटित होण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे.’

देशभरात फिरत असताना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला आंदोलनाला बसलेले पाहिले, तेव्हा आम्हाला जाणवले, की आपला मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. नीटइतकाच आमचा प्रश्नही गंभीर आहे, मग आम्ही का नाही आंदोलन करू शकत? आणि जर तुम्ही जिंकू शकता, तर आम्हीही जिंकू शकतो, असे विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि हिंमत प्रेरणादायी आहे, असे बोरा यांनी सांगितले.

सरकारला कसे ऐकायला लावायचे हे माहीत आहे!

विद्यार्थ्यांचे म्हणणे सरकारला ऐकायचे असते, तर त्यांनी ते कधीच ऐकले असते. त्यांना बौद्धिक हा शब्द नीट समजत नाही, त्यांच्याशी विचारपूर्वक चर्चा करायला गेल्यास त्यांच्या कानात गाणी वाजायला लागतात. मात्र, त्यांना ऐकायला कसे लावायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही बोरा यांनी सांगितले.