scorecardresearch

तोकडय़ा कपडय़ांमुळे युवतींना मारहाण ; पुण्यातील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा

तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी  खराडी भागातील एका सोसायटीत राहणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या दोन्ही युवती परराज्यातील आहेत.

अलका किसन पठारे, शीतल कमलेश पठारे, सीमा बाळासाहेब पठारे, सचिन किसन पठारे, केतन बाळासाहेब पठारे, किरण सचिन पठारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ज्योती संजय येळे (रा. लेक्सीस सोसायटी, अनसूया पार्क, रक्षकनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येळे यांची लेक्सीस सोसायटीत सदनिका आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या तीन युवती येळे यांच्याकडे भाडे तत्त्वावर राहायला आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व आरोपी याच सोसायटीत राहायला आहेत.

सोसायटीत राहणाऱ्या युवती सोसायटीच्या आवारात तोकडी वस्त्रे परिधान करून ये-जा करतात. त्याचा रहिवाशांना त्रास होतो, अशी तक्रार पठारे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री युवती राहत असलेल्या सदनिकेत सर्व आरोपी शिरले. त्यांनी युवतींना शिवीगाळ आणि मारहाणही केली तसेच मलाही धमकावले, असे येळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

शहरातील कर्वेनगर, कोथरूड, बावधन, हिंजवडी, खराडी, वडगाव शेरी, हडपसर या उपनगरात मोठय़ा संख्येने परराज्यातील युवती तसेच युवक वास्तव्यास आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेही अनेक जण पुण्यात सदनिका भाडय़ाने घेऊन राहतात.

सापत्न वागणूक..

शहरात मोठय़ा संख्येने परराज्यातील युवती नोकरी तसेच शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. अनेक युवती भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहतात. सोसायटीतील रहिवाशांकडून अनेकदा युवतींना त्रास दिला जातो. किरकोळ कारणांवरून त्यांच्याशी वाद घातला जातो. बाहेरगावाहून शिक्षण किंवा नोकरीसाठी आलेले युवक तसेच युवती वादात पडत नाहीत. मुकाटय़ाने बोलणे ऐकून घेणे, हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असतो. सदनिका भाडय़ाने देणाऱ्या मालकांशीही सोसायटीतील रहिवाशी वाद घालतात.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neighbour beats up girls with footwear for wearing shorts in pune zws

ताज्या बातम्या