पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावीची नवी पाठ्यपुस्तके शाळांना वितरित करण्यात आली आहेत. मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) विषयनिहाय तासिका विभागणीची पुस्तिका अद्याप उपलब्ध झाली नसल्याने इयत्ता, तुकडीनिहाय तासिकांचे अध्यापन, शिक्षकांचा कार्यभार, शाळेचे वार्षिक वेळापत्रक या बाबत शाळास्तरावर प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, तासिकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून, एक-दोन दिवसांत शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण ‘एससीईआरटी’कडून देण्यात आले.

राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांना नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीच्या नव्या पाठ्यपुस्तकांसह विषयनिहाय तासिका विभागणी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता या वर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पाठ्यपुस्तके येत आहेत. यातील दुसरीच्या तासिका गतवर्षीच्या आदेशानुसार स्पष्ट आहेत. मात्र तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांच्या तासिकांबाबत कोणतीही स्पष्टता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेली नाही. सद्यःस्थितीत २०१७चेच विषयनिहाय तासिका नियोजन वापरले जात आहे, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

शालेय वेळापत्रक हा शालेय प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शाळेतील उपलब्ध शिक्षकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध इयत्ता, तुकड्यांचे तासिका वाटप करणे हे अत्यंत किचकट काम आहे. तासिका वाटपानुसारच संपूर्ण शाळेचे संकलित वेळापत्रक तयार केले जाते. हे वेळापत्रक तयार करण्यास १० ते १५ दिवस लागतात. वर्षभराच्या कामकाजासाठी ते अत्यंत बारकाईने करावे लागते. येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार असूनही, तासिका विभागणी उपलब्ध नाही. तासिका वाटपाचे वेळापत्रक एप्रिल अखेरीसच प्रसिद्ध होणे गरजेचे होते. जेणेकरून पुरेशी तयारी करण्यासाठी शाळांना वेळ मिळाला असता. मात्र, अद्याप वेळापत्रक उपलब्ध नसल्याने शाळांचे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत, असेही गणपुले यांनी नमूद केले.

तासिका वाटपाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. एक-दोन दिवसांतच ते शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. – डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद