Neral Shirur Highway: मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांना अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे–शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून मुंबई आणि जेएनपीटी बंदराशी थेट संपर्क निर्माण होणार आहे.

राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देणारा हा महामार्ग प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे. विशेषतः रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून व्यापार, उद्योग आणि गुंतवणुकीसाठी नवे मार्ग खुले होणार आहेत. राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि उद्योग, रोजगार तसेच दळणवळण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणणारा हा महामार्ग प्रकल्प भविष्यात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदा

या महामार्गाचा सर्वाधिक फायदा खेड एसईझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव आणि सुपा या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांना होणार आहे. सध्या या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असली तरी वाहतूक कोंडी आणि दळणवळणातील अडचणीमुळे उद्योगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. नव्या चौपदरी महामार्गामुळे मालवाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार असून उद्योगांच्या विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यांतील ग्रामीण आणि निमशहरी भागांच्या विकासालाही या प्रकल्पामुळे वेग मिळणार आहे. रोजगारनिर्मिती, नवीन व्यवसाय संधी आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

पुणे–शिरूर मार्गावरील ताण कमी होणार

पुणे–शिरूर महामार्गावर गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी, प्रवासातील विलंब आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. नव्या पर्यायी चौपदरी मार्गामुळे या विद्यमान रस्त्यावरील ताण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होण्याची अपेक्षा आहे.

अजित पवार यांचा पाठपुरावा

या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.