प्राची आमले

विशेष मुलाच्या जन्मानंतर बसलेल्या धक्क्य़ातून सावरण्यासाठी पालकांच्या पुढाकारातून सुरू झालेला स्वमदत गट. डाउन सिन्ड्रोम असलेल्या मुलांच्या पालकांना मानसिक आधार देणारा ‘नेव्हर डाउन विथ डाउन्स’ हा स्वमदत गट व्हॉट्स अ‍ॅपवर कार्यरत आहे.

फेसबुक असो किंवा व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम असेल किंवा ब्लॉग या समाजमाध्यामांचा आपल्याकडे असलेली माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापर केला, तर त्याला मिळणारा प्रतिसाद हा वेगळा असतो. या समाजमाध्यमांवर थोडा डोळस फेरफटका मारला, तर अनेक सकारात्मक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे उदाहरण म्हणजे डाउन सिन्ड्रोम असलेल्या मुलांच्या पालकांना मानसिक आधार देणारा ‘नेव्हर डाउन विथ डाउन्स’ हा व्हॉट्स अ‍ॅपवर असलेला समूह.

डाउन्स सिन्ड्रोम असलेल्या सहा ते सात मुलांच्या पालकांच्या पुढाकारातून २०१४ साली हा गट सुरू झाला. डाउन्स सिन्ड्रोम असणाऱ्या मुलांचे आरोग्य, मानसिक, शारीरिक वाढ, त्यांना येणाऱ्या इतर समस्या यांसंबंधीच्या माहितीची देवाण-घेवाण या ग्रुप वर करण्यात येते. जयंती गाडगीळ, चंदना चितळे, पूर्वा देवधर, जयश्री आंबी, नीता भाटवडेकर आणि स्वाती कुलकर्णी यांनी एकत्र येऊन या गटाची सुरुवात केली.

संस्थेच्या सहसंस्थापिका जयंती गाडगीळ म्हणाल्या, विशेष मुलांच्या जन्मानंतर बसलेल्या धक्क्य़ातून सावरण्यासाठी त्यांना धीर देणे, त्यांना सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणे त्याचबरोबर मनात येणाऱ्या नैराश्याच्या भावनांचा निचरा करणे हा मुख्य हेतू हा गट सुरू करण्यामागे आहे. या गटामुळे आपण एकटे नसून, आपल्यासारखे इतर पालक देखील आहेत, ही भावना मानसिक बळ देणारी ठरते.

शहरातील या मुलांसाठी असलेल्या शाळा, विविध थेरपीच्या सुविधा, वैद्यकीय तज्ज्ञ, छंद अशा गोष्टींची माहिती या समूहाच्या माध्यमातून मिळते. त्याचबरोबर विविध तज्ज्ञांची माहितीपर सत्रे, स्पीच थेरपी, पालकांसाठी मानसिक तणावाचे सकारात्मक नियोजन, विशेष मुलांसाठी कोणत्या सरकारी विमा योजना आहेत याविषयी माहिती दिली जाते. तसेच दर वर्षी २१ मार्च रोजी जागतिक डाउन्स सिन्ड्रोम हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुलांचे विविध गुणदर्शन, फॅशन शो, ड्रम सर्कल यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग तसेच मदत देखील झाली आहे. या विषयी सांगताना गाडगीळ म्हणाल्या, सध्या या गटामध्ये २१६ सभासद आणि शंभरहून अधिक कुटुंब आहेत. मुलांना वेगवेगळ्या थेरपीसाठी घेऊन जाणे, त्यांची काळजी घेणे या सर्व गोष्टी करत असताना आठवडय़ाला, महिन्याला भेटीगाठी शक्य नसल्याने आम्ही समाजमाध्यमांचा आधार घेतला. या ग्रुपवर कोणताही वैद्यकीय सल्ला दिला जात नाही. फक्त मुलांना सवयी लावताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले जाते. फक्त शहरातील नव्हे तर शहराबाहेरील काही कुटुंब देखील गटात सहभागी आहेत.  येत्या काळात मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांना समाजात त्यांचे स्वत:चे स्थान निर्माण करता यावे, यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना विविध कौशल्ये शिकवून रोजगाराभिमुख करण्याचा मानस असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

डाउन सिन्ड्रोम असलेल्या मुलांच्या पालकांना गटात सहभागी होण्यासाठी ९८२२३२२७३८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.