पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी या इयत्तांना नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून, त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण ४ मेपासून, म्हणजे ऐन उन्हाळी सुटीत सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी सुरू होईल. त्यापूर्वी दुसरी, तिसरी, चौथी या इयत्तांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा तीन टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.राज्यस्तरावर ४ ते ७ मे या कालावधीत मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी, जिल्हा स्तरावर ११ ते १४ मे या कालावधीत मराठी आणि अन्य माध्यमांसाठी, तर तालुका स्तरावर १८ ते ३० मे या कालावधीत मराठी व अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उर्दू माध्यमासाठी केवळ राज्य आणि जिल्हा अशा दोनच स्तरांवर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे, तर इतर माध्यमांना मराठीसह सामावून घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्य स्तरावरील प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये इयत्ता दुसरीचे १८३, इयत्ता तिसरी आणि चौथीचे २६८; उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिलीसाठी १३८, इयत्ता तिसरी-चौथीचे १८० प्रशिक्षणार्थी अपेक्षित आहेत.
राज्य स्तरावरील तज्ज्ञांचा जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी आवश्यकतेनुसार उपयोग करून घेता येईल. या अनुषंगाने प्रशिक्षणासाठी सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी सुलभकांची नावे २० एप्रिलपर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यस्तर प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याच्या निर्धारित संख्येनुसार प्रशिक्षणार्थी निवड करताना उत्तम प्रशिक्षक कौशल्ये असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी सदस्य, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक, अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य, अशा तज्ज्ञांचा समावेश असावा, असे नमूद करण्यात आले आहे.
सहावीच्या प्रशिक्षणाबाबत स्वतंत्र सूचना
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार लागू करण्यात येणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीसह इयत्ता सहावीचाही समावेश आहे. मात्र, प्रशिक्षणामध्ये इयत्ता सहावीचा समावेश नाही. सहावीच्या प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खासगी शाळांतील शिक्षकांनाही प्रशिक्षण
खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येईल. मात्र, त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
