चांगले वाचनसाहित्य हाती देण्याच्या उद्देशाबरोबरच मुलांच्या हातून सर्जनशील कलाकृती घडावी या हेतूने ‘तुम्हीच बनवा तुमचं पुस्तक’ हा नवा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत मुलांना १८ भाषांतून ८०० पुस्तके वाचनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लेखक, विषय, वाचन पातळी आणि भाषेनुसार मुलांना गोष्टी शोधता येतील. असलेल्या गोष्टींचा अनुवाद करता येईल. या खुल्या व्यासपीठाचा वापर करून पुस्तके, लेखन-वाचन अशा चर्चामध्ये सहभागी होण्याबरोबरच मुलांना स्वत:ची गोष्ट किंवा चित्र लोकांपर्यंत पोहोचविता येणार आहेत.
‘प्रथम बुक्स’च्या ‘स्टोरी विव्हर’ उपक्रमांतर्गत www.prathambooks.org या संकेतस्थळावर मुलांना मराठी, इंग्रजीसह अन्य भारतीय भाषेतील गोष्टीची पुस्तके कोणालाही वाचता आणि डाऊनलोड करता येतील. एवढेच काय अगदी विनामूल्य छापता देखील येतील. या गोष्टी, त्यातील सुंदर चित्रं हे सारे काही खुल्या खजिन्यातील आहेत. अधिकाधिक मुलांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचविणे या ध्येयाचा एक भाग म्हणून हे पुढचं पाऊल टाकण्यात आले असल्याचे संध्या टाकसाळे यांनी सांगितले. प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक, हे ध्येय साध्य होण्यासाठी आणि पुस्तकांचा दुष्काळ संपविण्यासाठी डिजिटल व्यासपीठासारखे खुले आणि विनामूल्य उपक्रम मदत करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘असर’ संस्थेने २०१२ मध्ये केलेल्या पाहणीनुसार पाचवीत गेलेली ५० टक्के मुले जेमतेम दुसरीच्या पातळीवरची पुस्तके वाचू शकतात. चांगले वाचनसाहित्य मुलांच्या हातात पडत नाही. जे आहे ते परवडणारे नसते आणि हे साहित्य मातृभाषेत सहजी उपलब्ध होत नाही. प्रथम बुक्सने यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत १८ भारतीय भाषांत आणि परवडणाऱ्या किमतीत पुस्तके प्रकाशित केली. भारतातील २० कोटी मुलांसाठी सर्व प्रकाशकांकडून प्रसिद्ध होणारी पुस्तके धरली तरीही ती कमीच पडतात. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे त्यावरच उत्तर असू शकते. सर्व घरांमध्ये मोबाइल असतो. अगदी महापालिका शाळामंध्येही संगणक उपलब्ध असतो. त्यामुळे ‘स्टोरी विव्हर’वर मुले गोष्टी वाचू शकतील. यामध्ये शाळा, पालक, शिक्षक, ग्रंथपाल यांची मदत अपेक्षित आहे. डिजिटल वाचनाबरोबरच मुलांच्या आवडत्या पुस्तकांचे प्रिंट-आऊट शाळा त्यांना देऊ शकते.
मुलांसाठी चांगले साहित्य पोहोचविण्यासाठी असे व्यासपीठ भूमिका बजावू शकते. त्यामुळे मुले गोष्टी वाचतील किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचतील यासाठी प्रथम बुक्स मुलांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या संपर्कात आहे. प्रथम बुक्सच्या काही पथदर्शी संकेतस्थळावरून अनेक गोष्टी डाऊनलोड केल्या जातात आणि वर्गात वाचून दाखविल्या जातात असा अनुभव आहे. भारतात मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने या माध्यमाद्वारे मुलांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे, असेही टाकसाळे यांनी सांगितले.