पुणे : नवीन वीज दुरुस्ती विधेयकात वीज वितरणासाठी स्वतंत्र जाळे उभारण्याची अट काढून टाकण्यात येणार असल्याने एकाच भागात एकापेक्षा जास्त कंपन्यांना वितरण परवाने मिळण्याचा मार्ग आता मोकळा होईल. परिणामी, ग्राहकांना वीज पुरवठादार निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अधिक चांगली वीजसेवा मिळू शकेल. अर्थात, वितरणाकरिता समांतर परवान्यांसाठी अर्ज केलेल्या कंपन्यांना ‘महावितरण’सारख्या मूळ परवानाधारक वितरण कंपन्यांचे जाळे वापरून वीजपुरवठा करता येईल. मात्र, देखाभाल- दुरुस्तीत स्पष्टता नसल्याने सेवेबाबत काही मर्यादा राहतीलच.

सध्या वीज कायद्यानुसार एका भागात एकापेक्षा जास्त परवाने देण्याचे अधिकार राज्य वीज नियामक आयोगाकडे आहेत. यामध्ये, कंपन्यांना वीज पुरवठ्यासाठी खांब, तारा आणि उपकेंद्र आदी वितरण जाळे स्वतंत्रपणे उभारावे लागते. त्यामुळे एका भागात एकापेक्षा जास्त कंपन्यांना वीजपुरवठा करणे शक्य होत नव्हते. मुंबईत मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या कंपन्या एकाच वितरण जाळ्यावर वीजपुरवठा करतात. हाच प्रयोग आता देशभरात राबविण्यात येणार आहे.

नव्या वीजदुरुस्ती विधेयकातही सुरुवातीला समांतर परवान्यांसाठी स्वतंत्र वितरण जाळे उभारण्याची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, वितरण क्षेत्रातील स्पर्धा वाढून ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळावी, म्हणून ती अट काढून टाकण्यात येणार असल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले.

समांतर परवान्यांसाठी राज्य वीज नियामक आयोगांच्या माध्यमातून सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. एकच वितरण जाळे अनेक वितरकांना वापरता येईल. मात्र, त्या बदल्यात संबंधित कंपनीला वहन आकार द्यावा लागेल. हा दर ठरविण्याचे, तसेच वितरण जाळ्याच्या नियमनाचे अधिकार राज्य वीज नियामक आयोगाला मिळणार आहेत. नियामक आयोगाने परवानगी दिली, तर नव्या परवानाधारकांना स्वतःचे वितरण जाळेही विकसित करता येईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

वीज कायद्याने वीजनिर्मिती, वहन आणि व्यापारात स्पर्धा आणली. आता मात्र वीज वितरणातील स्पर्धेचा मार्गही मोकळा होईल. ग्राहकांना वीज पुरवठादार निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे अधिक चांगल्या सेवा मिळतील. समांतर परवान्यांमधील मोठा अडथळा या नव्या सुधारणेमुळे दूर होणार आहे. त्यामुळे राज्यातील महावितरणची मक्तेदारीही संपुष्टात येईल. जयंत देवमाजी सदस्य, राज्य वीज नियामक आयोग

वीज वितरणात एकापेक्षा जास्त कंपन्या येतील. मात्र, महावितरणचे वितरण जाळे असेल, तर ग्राहकसेवा कशा सुधारणार? वितरण यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीत अधिक स्पष्टता येणे गरजेचे आहे. तसेच ग्राहकांना चांगली सेवा मिळावी म्हणून आधी वितरण यंत्रणाही सक्षम करायला हवी. – विवेक वेलणकर, अध्यक्ष,

सजग नागरिक मंच समांतर परवान्यांसाठी स्वतंत्र वितरण जाळ्याची अट राहणार नाही. त्यामुळे वीज वितरणातील स्पर्धा वाढेल. ग्राहकांना चांगल्या सेवा मिळतील. त्याचबरोबर स्पर्धेमुळे वीजदरही कमी होतील. वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून चर्चेसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. जवळपास सर्वांचाच या सुधारणेला पाठिंबा आहे. त्यामुळे लवकरच या सुधारणेची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. –श्रीपाद नाईक,  केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री