New Mumbai Pune Expressway Project NHAI: अलीकडच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेक गंभीर अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाला समांतर असा नवीन द्रुतगर्ती मार्ग उभारण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. या नवीन मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा आणि व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. या नवीन मार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ ९० मिनिटांत पार करता येणार आहे.
नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग १३० किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील चौक येथून सुरू होणार आहे. जेएनपीटी बंदर (पागोटे) ते चौक या महामार्गाशी हा मार्ग जोडला जाईल. हा नवीन मार्ग चौकपासून थेट पुणे बाह्यवळण मार्गावर भोरमधील शिवरे गावाशी जोडला जाणार आहे. या नव्या मार्गामुळे पुणे हे अटल सेतूशी जोडले जाणार आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक, अपघात आणि सततची कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. नव्या मार्गामुळे सध्याच्या द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १५ हजार कोटी रुपये असणार आहे.
नवीन मुंबई-पुणे द्रुतगती प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प हा मार्ग आठपदरी असेल. हा मार्ग प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित होईल. यामुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, जेएनपीटी बंदर आणि औद्योगिक कॉरिडॉर यांच्यातील मालवाहतूक अधिक वेगवान होईल. विद्यमान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे सध्या प्रवासाचा कालावधी सुमारे अर्ध्या तासाने कमी झाला आहे. भविष्यात या मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता नवीन मार्ग फायद्याचा ठरेल. या मार्गावर दररोज तीन लाख वाहने धावू शकतील.
नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे फायदे
- मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार
- पुणे ते अटल सेतू थेट जलद जोडणी
- औद्योगिक आणि मालवाहतूक क्षेत्राला चालना
- सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ताण कमी
- रायगड, पुणे आणि नवी मुंबई परिसरातील विकासाला गती
मुंबई ते बंगळुरू सहा तासांच्या आत
नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मार्गरेषा, खर्च, भूसंपादन आणि बांधकामाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा हा मार्ग असेल. तो नवीन मुंबई-बंगळुरू महामार्गाचा भाग असेल. यामुळे भविष्यात मुंबई ते बंगळुरू हे अंतर सहा तासांपेक्षा कमी वेळेत पार करता येईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
