पुणे : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील तीव्र उताराचा भाग कमी करणे शक्य नसल्यामुळे आणि नवले पुलावरील अवजड वाहतूक कमी करण्यासाठी एक नवा पर्याय पुढे आला आहे. ऊर्से टोलनाका ते भोर तालुक्यातील शिवरे या पश्चिम बाह्यवळण वर्तुळाकार मार्गातील (आउटर रिंग रोड) शिवरे ते कासार अंबोली या २५ किलोमीटर अंतराचे काम एका वर्षांत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. साताऱ्याहून मुंबईकडे आणि मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने नवले पुलावर त्यामुळे येणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.
साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणि ब्रेक नादुरुस्त झाल्याने या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्याची घटना नवले पुलालगत गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. त्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, ९ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवले पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी हा नवा पर्याय पुढे आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) सूचना करण्यात आली असून, पुढील आठवड्यात ‘एमएसआरडीसी’चे अधिकारी या मार्गाची पाहणी करणार आहेत. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.‘रस्ता सुरक्षा समितीने नवले पुलावजळील अपघात कमी करण्यासाठी सन २०२२ मध्ये काही उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्या सर्व पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे,’ असा दावाही डुडी यांनी केला आहे.
‘सातारा बाजूने येताना नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. तो कमी करण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्याबाबत राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणा अभ्यास करण्याची सूचनाही केली होती. मात्र, उताराची तीव्रता कमी करणे शक्य नाही, असे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासंदर्भात दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यापैकी शिवरे ते कासार अंबोली या बाह्यवळण रिंग रोडला जोडणारा रस्ता प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे,’ असे डुडी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘सुतारवाडी ते रावेत आणि जांभूळवाडी ते रावेत या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचा आणखी एक पर्याय आहे. त्याचा आराखडा करून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यासाठी सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे अल्प कालावधीत यावर तोडगा काढण्यासाठी बाह्य रिंग रोडचा पर्यायाला प्राधान्य देण्यात आले आहे.’
‘‘एमएसआरडीसी’ने पश्चिम बाह्यवळण भागात ‘रिंग रोड’चे काम हाती घेतले आहे. ऊर्से ते कासार अंबोली या दरम्यान ६४ किलोमीटरचा एक टप्पा आहे. या टप्प्यात खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर शिवरेपासून कासार अंबोली या दरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरातील रिंग रोडचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या रिंग रोडसाठीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम एका वर्षात करणे शक्य होणार आहे,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नव्या पर्यायासंदर्भात ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. तसेच, जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणीही करण्यात येईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर साताऱ्याकडून येणारी जड वाहने नवले पुलावरून न येता पौड येथील कासार अंबोली येथून पुणे-मुंबई महामार्गाने जातील.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
