यंदा सुवासिक आंबेमोहोर तांदूळ महाग

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथून आंबेमोहोर तांदळाची मोठी आवक होते

पुणे : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली असून, बाजारात नवीन तांदूळ विक्रीसाठी दाखल झाला आहे. यंदाच्या हंगामात सुवासिक आंबेमोहोर तांदळाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटलमागे आठशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथून आंबेमोहोर तांदळाची मोठी आवक होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आंबेमोहोर तांदळाची निर्यात वाढली असून अमेरिका, युरोप, आफ्रिकेतून आंबेमोहोरसह बिगर बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. गतवर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ८३ लाख ४० हजार टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी गेल्या दहा महिन्यांत ११९ लाख ५० हजार टन तांदळाची निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील तांदूळ व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत लचकारी कोलमच्या दरात क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहेत. गतवर्षी लचकारी कोलमच्या क्विंटलचे दर ४२०० ते ४५०० रुपये होते. यंदा लचकारी कोलमचे प्रतिक्विंटलचे दर ४७०० ते ५००० रुपये आहेत. गेल्या हंगामात मध्यप्रदेशातील आंबेमोहोर तांदळाचे प्रतिक्विंटलचे दर ६८०० ते ७००० रुपये होते. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला मध्यप्रदेशातील आंबेमोहोरचे प्रतिक्विंटलचे दर ७८०० ते ८००० रुपये आहेत. आंध्रप्रदेशातील आंबेमोहोर तांदळाचे प्रतिक्िंवटलचे दर हंगामाच्या सुरुवातीला ७८०० ते ८०००  रुपये दरम्यान आहेत. बिगरबासमती तांदळाची परदेशातून असलेल्या मागणीमुळे दरवाढ झाली आहे. तांदळाच्या निर्यातीत भारताचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. थायलंड, व्हिएतनाम या देशात यंदा अनियमित पाऊस तसेच काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे.

पारंपरिक बासमतीऐवजी ११२१ बासमतीची लागवड

आंबेमोहोर, लचकारी कोलमवगळता अन्य तांदळाच्या दरात वाढ झाली नाही. पारंपरिक बासमती तांदळाची लागवड पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तेथील शेतकरी  पारंपरिक बासमती तांदळाऐवजी ११२१ बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळला आहे. त्यापैकी ८० टक्के बासमती तांदूळ प्रक्रिया करून (स्टिम) करून निर्यात, हॉटेल तसेच केटरिंग व्यवसायासाठी वापरला जातो. त्यामुळे पारंपरिक बासमती तांदळाचे तुकडे दुबार, मिनी दुबार, मोगरा, कणी या तांदळाचा तुटवडा जाणवत आहे.

बासमती तुकडा तांदूळ महाराष्ट्रात लोकप्रिय झाला होता. गेल्या काही वर्षांपासून बासमती तुकडा तांदळाला मागणीही वाढली होती. बासमती तुकडा तांदळाची आवक घटल्याने ग्राहकांकडून आंबेमोहोर, कालीमूछ, लचकारी कोलम, इंद्रायणी, सोनामसुरी या तांदळांना मागणी वाढली आहे.

– राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम)

तांदळाचे तुलनात्मक दर

तांदळाचा प्रकार        डिसेंबर २०१९    डिसेंबर २०२०

आंबेमोहोर (एमपी)  ६००० ते ६२००   ६८०० ते ७०००

आंबेमोहेर (एपी)     ७००० ते ७२००   ७८०० ते ८०००

लचकारी कोलम       ४२०० ते ४५००   ४५०० ते ५०००

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New rice entered into the market for sale in pune zws