ग्रामीण भागात दूरदूरपर्यंत पीएमपीकडून नवे मार्ग

पुणे : ताफ्यातील अपुऱ्या गाड्यांमुळे अनेक मार्ग बंद असताना आणि लांब पल्ल्याच्या मार्गांमुळे संचित तोट्यात वाढ होत असल्याचे लेखापरीक्षणातून वेळोवेळी स्पष्ट झाले असतानाही पीएमपीची नको त्या मार्गांवर धाव होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. शहरातील प्रवासी सेवेवर मर्यादा घालण्यात आल्या असताना पुणे महानगर विकास प्राधिकरणासह (पीएमआरडीए) जिल्ह्यातील अन्य भागात पीएमपीच्या सेवेचा विस्तार करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. नवीन मार्ग सुरू करण्याचे पत्र मिळताच पीएमपीकडून नवा मार्ग सुरू केला जात असल्याने हद्दीबाहेरच्या सेवेमुळे भविष्यात पीएमपीला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान दहा लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या दोन्ही शहरांमध्ये पीएमपीकडून कमी आणि अधिक अंतराच्या मार्गांवर सेवा दिली जाते. यातील बहुतांश लांब पल्ल्याचे मार्ग तोट्यात असून त्याला प्रवासीही नसल्याचे महापालिका दरवषीच्या लेखापरीक्षणातून अधोरेखित झाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीत पीएमपीने नव्याने २५ हून अधिक मार्ग सुरू केले आहेत. मंचर, दौंड, मोरगांव, लोणावळ्यापासून मुळशीतील अनेक गावांमध्ये सेवा विस्तारण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अपुरी आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दीड हजार गाड्या असून प्रवाशांना सक्षम, सुरक्षित प्रवास देण्यासाठी किमान साडेतीन हजार गाड्यांची आवश्यकता आहे. ताफ्यात गाड्यांची कमी संख्या, देखभाल दुरुस्तीअभावी आगारातच धूळ खात असलेल्या गाड्या आणि मार्गावर नादुरूस्त होऊन बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे पीएमपीच्या सेवेवर परिणाम होत आहे.

पीएमआरडीए जबाबदारी घेणार का?

पीएमपीकडून प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आणि या हद्दीपासून २० किलोमीटरच्या अंतरातील महत्त्वाच्या गावांत सेवा दिली जात होती. मात्र, पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत पीएमपीला पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर पीएमपीकडून दोन्ही महापालिकांच्या हद्दीबाहेर जवळपास २५ हून अधिक मार्ग नव्याने सुरू करण्यात आले असून येत्या काही दिवसांत नवे मार्ग सुरू करण्याचे नियोजनही सुरू आहे. पुणे आर्णि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पीएमपीचा तोटा भरून काढला जात आहे. मात्र तोट्याचा भार पीएमआरडीए घेणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पर्यायी सेवा असतानाही पीएमपीचे मार्ग

पीएमपीने ग्रामीण भागात नव्याने विस्तार केलेल्या मार्गांवर अन्य पर्यायी वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. एसटी, उपनगरीय रेल्वे गाड्यांची सुविधा या मार्गांवर आहे. अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या या साधनांचा वापर करून ग्रामीण भागातून अनेक प्रवासी कामानिमित्त शहरात येत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात सेवा विस्तारित करण्यामागे नेमका हेतू काय आणि त्यातून किती उत्पन्न मिळणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

’ कार्यान्वित असलेले मार्ग- २९६

’ दोन्ही महापालिका हद्दीबाहेरील मार्ग- २७

’ महापालिका हद्दीतील बंद मार्ग- २०

’ खंडित केलेले मार्ग- ६०