पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शालेय स्तरावरील अंमलबजावणी वेळापत्रकानुसार राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात चार इयत्तांचा अभ्यासक्रम बदलून नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार दुसरी, तिसरी, चौथी या तीन इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू करण्यात येणार असून, सहावीच्या अभ्यासक्रमाची अंतिम मान्यता बाकी आहे. त्यामुळे सहावीला नवा अभ्यासक्रम, नवी पाठ्यपुस्तके लागू होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राज्यातील शाळांसाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर आणि शालेय शिक्षण २०२४ तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले.
तसेच नवा अभ्यासक्रम लागू करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली, २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी, २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी, तर २०२८-२९ मध्ये इयत्ता आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांना नव्या अभ्यासक्रमानुसार नवी पाठ्यपुस्तके लागू करण्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीसाठीची नवी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. आता पुढील वर्षी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांची नव्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके लागू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दुसरी, तिसरी, चौथी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, सहावीच्या अभ्यासक्रमाची प्रक्रिया काही प्रमाणात बाकी आहे. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ दोनच महिने बाकी असल्याने ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नव्या पाठ्यपुस्तकांच्या तयारीबाबत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, ‘राज्यात गेल्यावर्षी इयत्ता पहिलीसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार सीबीएसईच्या धर्तीवर पाठ्यपुस्तके तयार करून लागू करण्यात आली. आता पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांसाठी नवा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यानुसार दुसरी, तिसरी, चौथीच्या नवीन पाठ्यपुस्तकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सहावीच्या अभ्यासक्रमाची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एका वेळी चार इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके पहिल्यांदाच करण्यात येत आहे.
पाठ्यपुस्तकांचे सामाजिक लेखापरीक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात येणार आहे. सहावीच्या पाठ्यपुस्तकांचेही काम सुरू आहे. यंदा पहिल्यांदाच बालभारतीने पाठ्यपुस्तकांची वैधानिक तपासणी, गुणवत्ता परीक्षण म्हणजेच सामाजिक लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दिव्यांगांसाठीच्या सूचना, सांकेतिक भाषा बोधचिन्हाचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात येत आहे. या माध्यमातून पाठ्यपुस्तकांचे वैश्विकीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) संचालक अनुराधा ओक यांनी सांगितले.
सहावीपासून व्यावसायिक शिक्षण
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार इयत्ता सहावीला व्यावसायिक शिक्षण लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गणित आणि विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकांसाठी सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय भाषा, कला, इतिहास, भूगोल असे विषय असणार आहेत.
