पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करुन भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई, तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शुक्रवारी (२६ डिसेंबर) पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आगामी महापालिका निवडणूक, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोळा, तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने वाहनचालकांविरुद्ध करण्यात येणारी कारवाई तीव्र करण्यात यावी. चौकाचौकात नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नववर्ष स्वागतासाठी लष्कर, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी परिसरात गर्दी होती. या भागात पबची संख्या मोठी आहे. या भागातील पब, रेस्टाॅरंटच्या परिसरातील गैरप्रकार होणार नाहीत, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पब, रेस्टाॅरंट, हाॅटेलच्या परिसरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियम धुडकावणे, मद्यप्राशन करुन भरधाव वाहने चालविणे, तसेच हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
