पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेली दोन स्त्री अर्भके रस्त्यावर ठेवून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पालकत्वाची जबाबदारी घेण्यापासून पळ काढत संबंधितांनी अर्भकांना रस्त्यावर ठेवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला. विमानतळजवळील खुळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि येरवड्यातील कल्याणीनगर येथील पदपथावर या घटना उघडकीस आल्या. अर्भकांना रस्त्यावर टाकून दिल्याप्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> पुणे: मटण केले नाही म्हणून पतीकडून महिलेच्या डोक्यात विळ्याने वार




स्त्री जातीचे पाच ते सहा दिवसांचे अर्भक खुळेवाडीतील भिंतीलगत असल्याची माहिती बुधवारी (३१ मे रोदी) पोलिसांना मिळाली. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ताब्यात घेतलेल्या अर्भकाला प्राथमिक उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी. बी. कवडे तपास करीत आहेत. कल्याणीनगरमधील आगाखान पूल परिसरातील पदपथावर चार ते पाच दिवसांचे स्त्री जातीचे अर्भकअसल्याची माहिती रात्री साडेआठच्या सुमारास येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बालकाला ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.