पुणे : महापालिका निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होऊ लागले, तसतसे गल्ली-बोळांत, मुख्य रस्त्यांवर फटाके फुटू लागले, गुलाल उधळला गेला, डीजे लागले, पाय तालांत नाचू लागले. आपला पुढारी जिंकल्याचे कौतुक कार्यकर्त्यांना असतेच, त्यामुळे हा जल्लोष साहजिकच. प्रश्न एकच पडला; तोही मतदारांना, की यांना निवडून देणारे आपण होतो, तरी आपली वाट अडवून हा जल्लोष का? का आता निकाल लागल्यावर आपली गरज संपली? की आपल्याला गृहीत धरले जाईल, हे आपण इतके गृहीत धरले आहे, की हे अपेक्षित होतेच?…
निवडणूक होईपर्यंत मतदारांच्या प्रसंगी अगदी पाया वगैरे पडणारे उमेदवार जिंकून आल्यावर आपल्या प्रश्नांकडे लक्ष देतील का, असा जो प्रश्न मतदारांना पडतो, त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षे या सर्वपक्षीय विजयी नगरसेवकांची असणार आहे. पुणेकरांना सध्या रोजच्या जगण्यात अनेक समस्या भेडसावताहेत. त्यांच्या निराकरणाकरिता दाद मागण्यासाठी चार वर्षांनंतर हक्काचे लोकप्रतिनिधी उपलब्ध होत आहेत, आणि त्यामुळे अपेक्षाही खूप आहेत.
सामान्य पुणेकर सकाळी उठल्यापासून त्याच्या पुढ्यात प्रश्नाची रांग लागते. दात घासायचे म्हटले, तरी बेसिनला पाणी असेल, याची शाश्वती नाही. आदल्या दिवशी पाणी गेल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने, म्हणजे पाणी नाहीच! त्यात जलवाहिनी फुटल्याने गळती झाली असेल, तर बोंबच. मोठी सोसायटी असेल, तर टँकर किंवा बोअरिंगचे पाणी, नाही तर अंघोळीची गोळी! हे कसेबसे सावरून पुणेकर कामाला निघतो. कामाला निघण्याची वेळही चुकवून चालत नाही, कारण रस्ते कायमच कोंडीने फुललेले असतात.
रस्त्यात कुणीही नियम मोडला, तरी वाद घालायचा नाही, जिवावर बेतू शकते. त्यामुळे या शहराला आपण कधी काळी सुरक्षित म्हणत होतो, असे हळहळत पुढे जायचे. नदी ओलांडून जाताना पुलावरून खाली नदीची अवकळा दिसते, ती पाहायची नाही. नाही तर प्रश्न पडून गाडीचा वेग कमी होतो आणि कार्यालयाची वेळ चुकू शकते! कालच दुरुस्त केलेल्या रस्त्यावर आज लगेच दिसणारे खोदकाम, न बुजवलेले खड्डे, रस्त्याची पातळी सोडून वर आलेली झाकणे काही काही पाहत बसायचे नाही! पीएमपी सोयीची असती, तर गेलो असतो, असे हळहळाल, तर लगेच पुढच्या चौकात बंद पडलेली बस दिसू शकते, त्यामुळे गाडी सावरत जात राहायचे…
काम आटोपून घरी येताना सकाळचेच चक्र पुन्हा संध्याकाळीही. घरी येताना वाहतुकीची संथ गती आजूबाजूला अनेक उंच पत्रे दाखवते. हे असते पुनर्विकासाचे स्वप्न. त्यातून उडणारी धूळ, बांधकामासाठी आलेल्या आडदांड वाहनांची दहशत याकडे पुन्हा दुर्लक्षच करायचे, कारण आपल्या सोसायटीसाठी आपल्याला कधी तरी हे स्वप्न पाहायचे असते. पडलाच प्रश्न तर असा, की पुनर्विकसित इमारतीत सदनिका वाढणार, म्हणजे कुटुंबे वाढणार, म्हणजे गाड्या वाढणार, त्या सगळ्या रस्त्यावर आल्या, की कोंडी आणखी वाढणार, याला उत्तर काय? मिळत नाही, त्यामुळे कोंडीतून वाट काढत जात राहायचे…बाकी मग कचऱ्याचे व्यवस्थापन, तो पुरावा, की जाळावा यावरून वाद; मोकळी मैदाने, उद्याने, जागा यांचे घेतले जाणारे घास; सकाळी फिरायला गेल्यावर दिसणारे टेकड्या फोडल्याचे लचके, झाडांची कत्तल; थेट नद्यांत जाऊन पोचणारे सांडपाणी… असे सगळे सगळे सोसत राहायचे.
दिवस सरून रात्र होताना पुन्हा स्वप्ने दिसताहेत, म्हणून पुणे टिकून आहे. पुणेकरांच्या या स्वप्नांना, आशांना, आकांक्षांना वाली हवा आहे, तो निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असावा, इतकीच माफक अपेक्षा आहे. म्हणूनच शुक्रवारी विजयाचा जल्लोष सुरू झाला, तेव्हा याचे उन्मादात रूपांतर नको, असेच पुणेकरांनी मनोमन चिंतले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही तसेच सांगितले आहे. तसे होईल ना?
