पुणे : ज्येष्ठ अभिनेते शिवाजी गणेशन यांच्या अभिनयाने आणि ए. पी. नागराजन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या तीन गाजलेल्या तमिळ चित्रपटांच्या ३५ एमएम प्रिंट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये जतनासाठी दाखल झाल्या आहेत.राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) चित्रपट संशोधन अधिकारी अपर्णा सुब्रमणियन यांनी या चित्रपटांच्या प्रिंट सुपूर्द केल्या. या संग्रहात ‘थिरुवरुत्चेल्वर’ (१९६७), ‘थिल्लाना मोहनांबाल’ (१९६८) आणि ‘थिरुविलयाडल’ (१९६५) या तीन चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘थिरुवरुत्चेल्वर’ची कोणत्याही स्वरूपातील प्रत यापूर्वी संग्रहात उपलब्ध नव्हती. त्यामुळे या चित्रपटाची प्रिंट राष्ट्रीय संग्रहात दाखल होणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
‘थिल्लाना मोहनांबाल’ आणि ‘थिरुविलयाडल’ यांच्या उपलब्ध असलेल्या संग्रहित प्रिंटमध्येही आता आणखी एका जतनयोग्य प्रिंटची भर पडली आहे. विशेषतः ‘थिरुविलयाडल’ची सध्या नव्याने मिळालेली प्रिंट सिनेमास्कोप स्वरूपातील ‘ऑप्टिकली मॉडिफाइड’ आवृत्ती आहे.नवीन प्रिंट उपलब्ध झाल्यामुळे संग्रहालयाला चित्रपटांच्या जतन प्रक्रियेत अधिक लवचीकता मिळणार आहे. एका प्रिंटचे संरक्षण करताना दुसऱ्या प्रिंटचा संदर्भ, तांत्रिक तपासणी, डिजिटायझेशन आणि तुलनात्मक अभ्यासासाठी वापर करता येणार आहे. त्यामुळे जुन्या चित्रपटांच्या संवर्धनाच्या दृष्टीने या प्रिंटचे महत्त्व वाढले आहे.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘भारतीय चित्रपट वारशाचे जतन करण्यासाठी संस्थात्मक संग्रहांबरोबरच व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांचाही महत्त्वाचा वाटा आहे. या तीन चित्रपटांच्या समावेशामुळे राष्ट्रीय संग्रह अधिक समृद्ध झाला असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण कलाकृती भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.’
चित्रपट जतनाची प्रक्रिया
ऑगस्ट २०२६ मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रिंटचा शोध सुरू झाला. ‘थिल्लाना मोहनांबाल’ची प्रिंट चेन्नई येथे मिळाली. ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी साई संजय यांच्या सहकार्याने ती पुण्यात आणण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीतून ‘थिरुविलयाडल’ आणि ‘थिरुवरुत्चेल्वर’ यांच्या प्रिंटही शोधण्यात आल्या. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे ‘थिरुवरुत्चेल्वर’ची प्रत नसल्याचे समजल्यानंतर ती प्रिंट संग्रहालयासाठी मिळविण्यास प्राधान्य देण्यात आले. तिन्ही प्रिंट १३ सप्टेंबर रोजी चेन्नईहून पुण्यात आणण्यात आल्या. या तिन्ही प्रिंटमध्ये मॅजेंटा रंग फिका होणे, तसेच प्रोजेक्टरमुळे निर्माण झालेल्या उभ्या ओरखड्यांच्या खुणा दिसून येतात. उष्ण आणि प्रतिकूल हवामानातील दीर्घ काळाचा वापर व साठवणुकीचा त्यावर परिणाम झाल्याचे दिसते. त्यामुळे उर्वरित फिल्म प्रिंट संस्थात्मक संग्रहात सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
