स्वयंसेवी संस्थांची पीएमपीकडे मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमपीच्या मासिक पासमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (आरटीए) मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र आरटीएच्या मान्यतेशिवाय दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि दरवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

पीएमपीकडून दिल्या जाणाऱ्या पाससंदर्भात महापालिका हद्द आणि हद्दीबाहेरील प्रवाशांसाठी वेगळे दर न आकारता एकच दर पाससाठी आकारण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पीएमपी प्रशासनाकडून महापालिका हद्दीतील मार्ग आणि हद्दीबाहेरचे मार्ग या दोन्हींसाठी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये झाली असून महापालिका हद्दीतील प्रवाशांना दोनशे रुपयांचा भरुदड बसणार आहे. यापूर्वी महापालिका हद्दीतील प्रवाशांना मासिक पाससाठी एक हजार दोनशे रुपये तर, हद्दीबाहेरील मार्गासाठी पंधराशे रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे हद्दीबाहेरील मार्गासाठीच्या प्रवाशांना शंभर रुपये कमी द्यावे लागणार आहेत. याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासमध्ये ५७ टक्के, विद्यार्थी मासिक पासमध्ये पंचवीस टक्के, सामान्य पासच्या रकमेत १७ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सजग नागरिक मंच प्रणीत पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला पत्र पाठवून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.

दरवाढ करताना नियमाप्रमाणे प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरच पीएमपी प्रशासनाकडून प्राधिकरणाला असा प्रस्ताव सादर होऊ शकतो. दरवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ अशा सर्वाचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. मात्र संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय परस्पर घेण्यात आल्याचेही त्यामुळे पुढे आले आहे. प्राधिकरणामध्ये गेल्या पाच वर्षांपासून ग्राहक प्रतिनिधींची जागा रिक्त आहे. त्यामुळे प्रवाशांचे म्हणणे प्राधिकरणापर्यंत पोहोचत नाही. नैसर्गिक न्याय तत्त्वांचा विचार करून पीएमपीच्या प्रस्तावित पास दरवाढीवर निर्णय घेण्यापूर्वी जनसुनावणी होऊन संबंधित सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे राठी यांनी स्पष्ट केले आहे.

पासचा गैरवापर भोवणार

विनातिकीट प्रवास, पीएमपीच्या पासवर खाडाखोड करून गैरवापर करणे यापुढे प्रवाशांना चांगलेच महागात पडणार आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार दंडाची रक्कम शंभर रुपयांवरून पाचशे रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तीनशे रुपयांचा अधिकचा दंड भरावा लागणार आहे. पासचा गैरवापर केल्यासही पाचशे रुपयांचा दंड असून येत्या सोमवारपासून (२१ ऑगस्ट) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngo objection on pmpml bus pass rate hike
First published on: 19-08-2017 at 04:24 IST