पुणे : देशभरात महामार्गावर जिथे टोल नाका असेल त्या २० किलोमीटर परिघातील स्थानिकांना टोलमधून सवलत दिली जाते. अनेक वेळा या सवलतीवरून वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे नेमकी सवलत कुणाला, असाही प्रश्न वारंवार उपस्थित होतो. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाकडून स्थानिकांना आता डिजिटल टोल पास दिले जाणार असून, त्यामुळे यापुढे वादाचे प्रसंग टळणार आहेत. याचबरोबर संबंधित वाहन त्या परिसरातील आहे की नाही हे शोधण्यासाठी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपवर नागरिककेंद्रित सुविधा सुरु केल्या आहेत. त्यात ऑनलाइन लोकल पासचा समावेश आहे. टोल नाक्याच्या २० किलोमीटर परिघामध्ये राहणारे रहिवासी ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने लोकल पास खरेदी करू शकतील. त्यामुळे त्यांना महिन्याभरात त्या टोल नाक्यावरून अमर्यादित प्रवास करता येईल. यापूर्वी, प्रवाशांना टोल नाक्यावर प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती. नवीन डिजिटल प्रणालीमुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येईल.
सध्या सुविधा कुठे?
या नवीन सुविधेचा उद्देश हा प्रगत डिजिटल सेवा पुरवणे, कागदपत्रांची प्रत्यक्ष पूर्तता करण्याची गरज दूर करणे आणि प्रवाशांना जलद मदत मिळवून देणे आहे. याद्वारे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. डिजिटल लोकल टोल पासची पहिली सुविधा दिल्लीतील ‘अर्बन एक्सटेंशन रोड-२’ वरील मुंडका-बक्करवाला टोल नाका येथे सुरू करण्यात आली आहे. लवकरच ती देशभरातील इतर टोल नाक्यांवर लागू केली जाईल. मात्र ही सुविधा व्यावसायिक वाहनांना लागू होणार नाही.
तंत्रज्ञानाद्वारे गैरप्रकारांना आळा?
हा उपक्रम डिजीलॉकर आणि वाहन यांसारख्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी संलग्न असेल. त्यामुळे प्रवाशाचा पत्ता, वाहनाचा क्रमांक आणि लिंक केलेला फास्टॅग यांच्याशी संबंधित तपशील आपोआप मिळवता येईल. लोकल पाससाठीची पात्रता जीआयएस-आधारित पडताळणीद्वारे निश्चित केली जाणार आहे. यामुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष पूर्तता करण्याची गरज राहणार नाही. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता जपली जाणार असून गैरप्रकारांना आळा बसणार आहे. ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपवरील वार्षिक पासच्या विक्रीला मिळालेल्या यशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या ॲपद्वारे ८० लाखांहून अधिक वार्षिक पासची विक्री झाली असून, ते त्वरित कार्यान्वित होतात. हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करण्यास उपलब्ध आहे.
