पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील अप्पूघर आता नव्या व अत्याधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे. १८ कोटी ६० लाखांच्या खासगी गुंतवणुकीतून या उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे.

महापालिकेचे शहरातील सर्वांत जुने मनोरंजनालय म्हणून अप्पूघरची ओळख आहे. काळाच्या ओघात येथील बहुतांशी खेळणी जुनी झाली आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेली यंत्रसामग्री व खेळणीमुळे नवी पिढी याकडे आकर्षित होत नसल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम महसुलावर होत होता. नव्या पर्यटन स्थळांशी स्पर्धा करणे कठीण झाल्यामुळे अप्पूघरचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. अप्पूघरच्या ठेकेदाराकडून १८ कोटी ६० लाख रुपयांची येथे गुंतवणूक केली जाणार आहे. तेथे पाण्यावरील घसरगुंडी, फ्लॉइंग सिनेमा, ३६० अंशातील इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेझ व इन्फिनिटी टनल, नायगारा कृत्रिम धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क, आर्केड गेम्स, एआर-व्हीआर झोन आणि इंटरॅक्टिव्ह सेल्फी झोन यांसारख्या अत्याधुनिक व थरारक राईड्सची भर पडणार आहे. नेचर व किड्स थीमवर उद्यानात सुशोभीकरण केले जाणार आहे.

अप्पूघर १५ वर्षांसाठी ठेकेदाराकडे

डिजिटल तिकीट प्रणाली, स्मार्ट वाहनतळ, आधुनिक फूड कोर्ट, पिण्याचे पाणी, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध असणार आहे. अत्याधुनिकरण १८ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. अप्पूघर पुढील १५ वर्षांसाठी ठेकेदाराला देण्यास उपसूचनेसह स्थायी समितीने मान्यता दिली.

शौचालयाचे धोरण

वाढते शहरीकरण, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि लोकसंख्येच्या तुलनेत निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने नवीन शौचालय धोरण तयार करण्यात आले आहे. शौचालयांची सद्य:स्थिती, उपलब्ध सुविधा, लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक शौचालयांची संख्या, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वाहतूक केंद्र, उद्याने, धार्मिक स्थळे, झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचे भाग, प्रमुख रस्ते व इतर गर्दीच्या ठिकाणांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या नवीन धोरणालाही मान्यता देण्यात आली.

अप्पूघरचे अत्याधुनिकरण १८ महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. पहिल्यावर्षी दहा टक्के आणि त्यानंतर दरवर्षी पाच टक्के वार्षिक भाडेवाढ महापालिकेला मिळणार आहे. शहराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भर पडणार असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास स्थायी समिती अध्यक्ष
अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला.