Pimpri Nigdi Metro Construction Update: पिंपरी ते निगडी या मार्गावर महामेट्रोकडून सुरू असलेल्या कामामुळे सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, खडी रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. परिणामी, सेवा रस्ते दुरुस्त केल्याशिवाय मेट्रोला निधी देणार नसल्याची भूमिका स्थायी समितीने घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो धावत आहे. पिंपरीपासून निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंत ४.४१३ किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम सध्या सुरू आहे. ते काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या ९६० कोटी १८ लाख खर्चापैकी महापालिका १४६ कोटी ९१ लाखांचा निधी देणार आहे. त्यापैकी ४९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

‘पन्नास कोटी रुपयांना कार्योत्तर मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, मेट्रोच्या कामामुळे निगडी ते चिंचवडपर्यंतच्या सेवा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे महामेट्रोने अगोदर रस्त्यांची दुरुस्ती करावी. रस्ते दुरुस्त केल्याशिवाय हा विषय मंजूर केला जाणार नाही,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

चिखलीतील संतपीठाला एक कोटी

चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळा आहे. संतपीठासाठी असलेली माध्यमिक शिक्षण विभागाची सन २०२५-२६ मधील एक कोटी रुपयांची तरतूद खर्च झालेली नाही. तो निधी संतपीठाच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची मागणी संतपीठाने केली होती. त्यानुसार, ती रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात आली.

‘स्मार्ट सिटी’चा सव्वादोन कोटींचा भार

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रकल्पांतर्गत जीआयएस इनॉबेल ईआरपीकरिता व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करून देण्याचे आदेश १५ मार्च २०२४ रोजी एका संस्थेला देण्यात आले आहेत. तो प्रकल्प स्मार्ट सिटीने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडे ९ मार्च २०२६ ला वर्ग केला. त्यापूर्वी, ४ जून २०२५ पासून या कामास एका वर्षाची मुदतवाढ देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्यासाठी दोन कोटी २० लाख सात हजार २५२ रुपये खर्च होणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

मनोरे हटविणार

महापारेषण कंपनीचे १३२ केव्ही क्षमतेचे दोन मनोरे (टॉवर) रावेतमधील इंद्रप्रभा सोसायटी येथील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत आहेत. ते मनोरे हटविण्यासाठी २१ लाख ५५ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.