पिंपरी : निगडी प्राधिकरणात गेल्या महिनाभरापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. प्राधिकरण परिसरात शनिवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. काही भागांत बारा तास वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. दुपारी उन्हामुळे शरीराची काहिली होत आहे. त्यातच या परिसरात सातत्याने वाहिन्यांत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. गृहिणींना घरगुती कामे, तर विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. उद्वाहक (लिफ्ट), पाणीपुरवठा व्यवस्था, मोबाइल व इंटरनेट नेटवर्क यावरही त्याचा परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी परिसर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन वीजवाहिनी जोडावी,’ अशी मागणी रहिवासी नीलेश शिंदे यांनी केली.
‘महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या आहेत, तरी वीजपुरवठा व्यवस्थेमध्ये कायमस्वरूपी सुधारणा झालेली नाही. दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण केली जाते. मात्र, त्यानंतरही तासन् तास वीजपुरवठा पूर्ववत होत नाही,’ असे ते म्हणाले.
वीजपुरवठ्यातील खंडाचा उद्योग-व्यवसायांनादेखील फटका बसतो आहे. निगडी प्राधिकरणातील कृष्ण मंदिर परिसरातील रोहित्रावर जाहिरात फलक पडला. त्यामुळे रोहित्राला आग लागली होती. यामुळे सोमवारी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला.
महिनाभरापासून दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज वाहिन्यांत सातत्याने बिघाड होत आहे. बिघाड लवकर सापडत नाही. रोहित्राची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे
नीलेश शिंदे म्हणाले. वीजवाहिन्या काही कारणांमुळे खराब होत आहेत. मेट्रोच्या कामामुळे शनिवारी वाहिनी नादुरुस्त झाली होती. आठवडाभरात विजेची समस्या जास्त आहे. नादुरुस्त झालेल्या वाहिनीची दुरुस्ती आणि जोडणीसाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, महावितरणच्या भोसरी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरवदे यांनी सांगितले.
