पिंपरी : महाराष्ट्र मेट्राे रेल काॅर्पाेरेशन लिमिटेडच्या (महामेट्राे) पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणाऱ्या प्रस्तावित भक्ती-शक्ती ते चाकण या ४५.२९५ किलाेमीटर अंतराच्या आणि ३४ स्थानकांचा समावेश असलेल्या नवीन मेट्राे मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. बारा हजार ९३७ कोटी २३ लाखांच्या या आराखड्याला महापालिका सर्वसाधारण सभेने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.
या प्रकल्पात पिंपरी-चिंचवडमध्ये २८, तर एकूण ३४ मेट्रो स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासंदर्भात लाेकप्रतिनिधींसमाेर दोन वेळा सादरीकरण करण्यात आले होते. हा विषय सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी मांडला. त्याला शत्रुघ्न काटे यांनी अनुमोदन दिले. प्राप्त होणाऱ्या उपसूचनेनुसार आराखड्यामध्ये समावेश करण्याची उपसूचना ज्ञानेश्वर जगताप यांनी दिली. त्याला कुशाग्र कदम यांनी अनुमोदन दिले. उपसूचना स्वीकारून महापौर रवी लांडगे यांनी विषयाला मंजुरी दिली. आराखडा आता राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५१९ अंतर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दापोडी ते निगडी या एकमेव मेट्रो मार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा विस्तार होणार आहे.
असा आहे मेट्रोचा मार्ग
हा नवा मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक येथून सुरू होणार आहे. तेथून निगडीतील ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळेगाव, पुनावळे, ताथवडेगाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक असा वाकडपर्यंत जाणार आहे. तेथे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गावरील वाकड मेट्रो स्थानकाला मेट्रो बदलता येणार आहे. येथून विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाता चौक, सेन्चुरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर क्रमांक एक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडीवरून चाकणपर्यंत मेट्रो जाणार आहे.
महापालिकेचा ३२१ कोटींचा हिस्सा
या मेट्रो मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी एक हजार ७२१ कोटी ७१ लाख भाग भांडवल देणार आहेत. दोन्ही सरकारकडून प्रत्येकी ५१० कोटी २३ लाखांचे कर्ज, राज्य सरकारकडून आणखी ८९८ कोटी १४ लाखांचे कर्ज घेतले जाणार आहे. निधी पुरवठा संस्थांकडून सहा हजार ६९५ कोटी ८१ लाखांचे कर्ज घेतले जाणार आहे. महापालिकेचा ३२० कोटी ९६ लाखांचा हिस्सा असणार आहे.
