पिंपरी : आळंदीचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व तसेच या परिसरात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज विचारात घेऊन मेट्रोची सुविधा आळंदीला उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे चाकण-निगडी मेट्रो मार्गिकेमध्ये आळंदी स्थानकाचा समावेश करावा अशी मागणी महापौर रवी लांडगे यांनी केली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे महापौरांनी ही मागणी केली आहे. भक्ती शक्ती-मुकाई चौक-वाकड-नाशिक फाटा-माेशी- चाकण ही ४५.२९ कि.मी. लांबीची प्रस्तावित मेट्रो मार्गिका असून त्यामध्ये ३४ स्थानकांचा सनावेश आहे. यामध्ये आळंदीचाही समावेश करावा. या मेट्राे मार्गिकेच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यासह केंद्र शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंतीही महापौर लांडगे यांनी मोहोळ यांना केली.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नदीक्षेत्राशी संबंधित महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय यंत्रणा व संबंधित प्राधिकरणांनी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याऐवजी परस्पर समन्वयातून ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. प्रदूषणाची कारणे निश्चित करून सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि नदी संवर्धनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, अशी विनंती महापौर लांडगे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता महापौरांनी अधोरेखित केली. या प्रकल्पाशी संबंधित विविध प्रलंबित बाबींवर सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी आणि पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशी विनंती त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित विविध केंद्र पुरस्कृत योजना आणि विकासकामांचाही आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, अमृत दोन, स्मार्ट सिटी मिशन, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा तसेच राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम यांसारख्या योजनांशी संबंधित प्रलंबित बाबींना गती देऊन केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून शहराला अधिकाधिक लाभ मिळावा, अशी भूमिका दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवी लांडगे यांनी मांडली. महापौर रवी लांडगे यांनी मांडलेल्या शहराच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवून शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे महापौर लांडगे यांनी यावेळी नमूद केले.
