पुणे : परकीय नागरिकाच्या वास्तव्याची माहिती पोलीस ठाण्यास न देता भाडेकरू ठेवणारा रिअल इस्टेट एजंट आणि घरमालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला ही नायजेरिया देशाची असून, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला गेल्या काही महिन्यांपासून कोंढव्यात बेकायदा वास्तव्यास होती. रिअल इस्टेट एजंट अदनान शबीर हुसेन बोहरा (वय २९, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि सदनिकेचा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोंढव्यातील पोकळे मळा येथील शिवकृपा इमारतीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून परदेशी महिला बेकायदा वास्तव्य करीत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक विभागाला मिळाली होती. त्यांनी याबाबत कोंढवा पोलिसांना कळवले. त्यानुसार २ जून रोजी कोंढवा पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी शिवकृपा इमारतीतील एका सदनिकेमध्ये परदेशी महिला वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. संबंधित महिलेला अदनान याच्यामार्फत भाडेकरू म्हणून ठेवले असून, सदनिकेचा भाडेकरार आणि पोलीस तपासणी करण्यात आली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.