पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका)कारवाई करण्यात आलेल्या नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अटक करण्यात आली. वारजे माळवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतून ताब्यात घेतले अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेला गुंड नीलेश घायवळ हा सध्या परदेशात असून, अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. घायवळ हा सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसंनी ब्रिटीश उच्चायुक्तांशी संपर्क पत्रव्ववहार करण्यात आले आहे.
खंडणी प्रकरणात घायवळ टोळीविरुद्ध वारजे पोलिसांनी ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात अमोल लाखे याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. लाखे हा बार्शी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सुजाता तानवडे, अजय परमार, पोलीस निरीक्षक प्रकाश धेेंडे, उपनिरीक्षक संजय नरळे, अमित शेलार, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर, गणेश शिंदे, सत्याजीत लोंढे यांनी ही कारवाई केली.
