पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गण-गट रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनुनेसार गट आणि गणांची रचना करण्यासाठी सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जुन्नर, खेड आणि इंदापूर या तालुक्यातून प्रत्येकी नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार आहेत, तर मुळशी, भोर तालुक्यातून प्रत्येकी चार, वेल्हे तालुक्यातून दोन जिल्हा परिषद निवडले जाणार आहेत.
मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेसाठी गट, तर पंचायत समित्यांसाठी गणांची रचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सन २०११ च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३३ लाख ४८ हजार ४९५ आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी ८२ गट, तर पंचायत समित्यांसाठी १३ तालुके मिळून १६४ गण आहेत.

तालुका- जिल्हा परिषद सदस्यांची संख्या, कंसात पंचायत समिती सदस्यांची संख्या
जुन्नर नऊ (१८), आंबेगाव पाच (दहा), शिरूर आठ (१६), खेड नऊ (१८), मावळ सहा (१२), मुळशी चार (आठ), हवेली सहा (१२), दौंड आठ (१६), पुरंदर पाच (दहा), वेल्हा दोन (चार), भोर चार (आठ), बारामती सात (१४), इंदापूर नऊ (१८) एकूण ८२ (१६४)