पुणे: राज्यातील प्रत्येक १०० महिलांमागे जवळपास नऊ महिला कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील तंबाखूचे सेवन करतात अशी धक्कादायक बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांमध्ये हे प्रमाण ११.८ टक्के असून शहरी भागात ते ४.५ टक्के आहे. एकूण राज्यात महिलांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण ८.८ टक्के नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण महिलांमध्ये हे प्रमाण शहरी भागाच्या सुमारे अडीच पट आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे २०२४ चे आकडे प्रसिद्ध करण्यात आले. या राष्ट्रीय सर्वेक्षणाचा सहावा अंक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यावरून ही धक्कादायक बाब समोर आली. पुरुषांमध्ये तंबाखूचे व्यसन अधिक असून ३१.३ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. त्यामध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण ३८.१ टक्के, तर शहरी भागात २१.९ टक्के आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये तंबाखूचे व्यसन साडेतीनपट आहे.

मद्यपानाच्या बाबतीत महिलांमध्ये प्रमाण अत्यल्प असून केवळ ०.३ टक्के महिला मद्यपान करतात. याउलट १२.२ टक्के पुरुष मद्यपान करतात. ग्रामीण भागातील १३.१ टक्के, तर शहरी भागातील ११ टक्के पुरुष मद्यपान करत असल्याची नोंद आहे. म्हणजे पुरुषांमध्ये मद्यपानाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत सुमारे ४० पट अधिक आहे.

तंबाखूचे प्रमाण घटले, तरी चिंता कायम .. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या अंकामध्ये महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ११ टक्के होते. ते आता ८.८ टक्क्यांवर आले आहे. पुरुषांमध्येही हे प्रमाण ३३.८ टक्क्यांवरून ३१.३ टक्क्यांवर आले आहे. म्हणजे घट झाली असली तरी तंबाखूचे व्यसन अजूनही मोठ्या प्रमाणात कायम आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखू आणि मद्यपानामुळे कर्करोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने व्यसनमुक्तीबाबत जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.