बारामती : निरा–मोरगाव रस्त्यावरील चौधरवाडी फाटा येथे टेम्पो आणि मोपेड यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू, तर त्यांचा नऊ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) आणि तिची बहीण सेजल (वय १५, रा. मुरूम, ता. फलटण, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा भाऊ पवन (वय ९) हा जखमी झाला असून, त्याला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे वडगाव निंबाळकर पोलिसांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. या अपघातामुळे काही काळ निरा-मोरगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.