पुणे : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार डाॅ. निशिकांत दुबे यांच्या भीमाशंकर मंदिर दर्शनाने नवा वाद निर्माण झाला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर दुरुस्तीच्या कामांमुळे भाविकांसाठी बंद असताना खासदारांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, ‘दर्शनासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती.

भीमाशंकर मंदिर ट्रस्टच्या व्यक्तीकडून परवानगी दिली असेल तर, त्याची माहिती घेतली जाईल,’ असे या वादावर जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.भीमाशंकर मंदिर गेल्या काही दिवसांपासून भाविकांसाठी बंद आहे. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरातील कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत.

मात्र, झारखंड येथील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे आमदार निशिकांत दुबे यांना शनिवारी ‘व्हीआयपी’ दर्शन देण्यात आले. त्या संदर्भात समाजमाध्यमातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामांमुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ९ जानेवारीपासून मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला होता.

गेल्या महिन्यात महाशिवरात्र असतानाही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवले होते. तसेच, यात्राही रद्द करण्यात आली होती. मात्र, सर्वसामान्य भाविकांना एक न्याय आणि व्हीआयपींना वेगळा न्याय का देण्यात आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.दरम्यान, ‘खासदार दुबे आणि त्यांचे सहकारी भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती नव्हती.

त्या संदर्भात जिल्हा प्रशासनानेही परवानगी दिलेली नाही. मात्र, मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिली का, याची माहिती घेतली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल,’ असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.