पिंपरी : ‘वाहनांमध्ये सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता सुरक्षित आणि विश्वासार्ह गतिशीलतेसाठी सायबर सुरक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ बनला आहे. शैक्षणिक संस्थांनी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेचा समावेश करणे गरजेचे आहे. प्रयोगशाळा, कार्यप्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) माध्यमातून उद्योगांसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ तयार करावे,’ असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), ऑटोसिफू प्रा. लि. आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिक फाटा येथील आयोजित ‘ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा परिषदे’ला गडकरी यांनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या. ‘सीआयआरटी’चे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा विभागाचे फारुख मखदूम, जगमंगल सोशल फाउंडेशनच्या संचालक प्रिया गुजराथी, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शहाजी सोलुंखे, ऑटोसिफूचे संचालक विक्रम पगारे, यासह विविध वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘भारतातील ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा परिसंस्था या परिषदेच्या माध्यमातून मजबूत करता येईल. ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा ही रस्ता सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली आहे. जागतिक मानकांशी सुसंगत राहून केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्रालयाने वाहनांसाठीच्या नियमांमध्ये सायबर सुरक्षा व्यवस्था आणि सॉफ्टवेअर अपडेट व्यवस्थेचा समावेश केला आहे. भारताचा दृष्टिकोन केवळ वाहनांचे उत्पादन करण्यातच नव्हे, तर स्वतःच्या सामर्थ्यावर आणि कौशल्यावर आधारित डिझायनिंग, सुरक्षा आणि प्रमाणीकरण यामध्येही जागतिक स्तरावर अग्रेसर बनण्याचा आहे,’ असे गडकरी म्हणाले.

‘ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कुशल व्यावसायिक तयार करणे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नव्या पिढीतील गुणवंत तरुणांना उद्योगाच्या गरजांनुसार तयार करणे आणि भविष्यातील तांत्रिक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्यातील मजबूत सहकार्यामुळे भारतात ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल,’ असे डॉ. देवेंद्र सिंह यांनी सांगितले.

सप्टेंबरमध्ये जनजागृती अभियान

१५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत बीसीए, एमसीए आणि अभियांत्रिकी शाखेतील ५० हजार विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा विषयावरील पहिल्या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील सॉफ्टवेअर-आधारित वाहन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा धोके आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.