पुणे : ‘पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सगळ्यांना मुंबई, पुण्यातच यायचे आहे. बाहेरून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता प्रदूषण आणि कोंडीमुळे मलाही पुण्यात येण्याची इच्छा होत नाही. पुणे इतक्या वेगाने वाढेल, याचा अंदाजच नव्हता, त्यामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नियोजन चुकले. पुणेकरांना होत असलेल्या त्रासाला कुठेतरी मीही जबाबदार आहे,’ अशी कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

‘मी राज्यात मंत्री असताना चांदणी चौकातील पश्चिम बाह्यवळणापर्यंत रस्ता बांधला. त्या वेळी पुण्याचा विस्तार एवढ्या वेगाने होईल, असे वाटले नव्हते. मुंबई-पुणे महामार्ग बांधताना भविष्यातील वाहतुकीचा विचार करून तो बांधायला हवा होता, असे आता वाटते,’ असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. शेजूळ आदी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले,‘हवा प्रदूषण, वाहतूक कोंडी असतानाही पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसगणिक वाढत असल्याने पुणे आता हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे आता आजच्या अडचणींवर तात्पुरते उपाय करण्याऐवजी भविष्याचा विचार करून रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे गरजेचे आहे.’ ‘राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई-पुणे महामार्गाचे नियोजन करताना चारपदरी रस्त्याचा प्रस्ताव होता. भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन सहापदरी रस्त्याचा आग्रह धरला. मात्र, आता हा मार्गही अपुरा पडत आहे,’ अशी कबुली गडकरी यांनी दिली.

‘चांदणी चौकाच्या नियोजनात चूक’

‘नियोजनातील चुकांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. मी राज्यात मंत्री असताना चांदणी चौकातील पश्चिम बाह्यवळणापर्यंत रस्ता बांधला. त्या वेळी पुण्याचा विस्तार एवढ्या वेगाने होईल, असे वाटले नव्हते. माझ्या या चुकीमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित करताना किमान २५ ते ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असते,’ असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुण्यात ६० हजार कोटींची कामे

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि खेड-नाशिक फाटा या मार्गांवर कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे-संभाजीनगर मार्ग सहापदरी करण्याचे कामही सुरू आहे. या विविध रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे पुढील काळात करण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.