पुणे : माझ्या आईचा मृत्यू होण्यापूर्वी ती पंढरपूर आणि तिथून पुढे गाणगापूरला गेली होती. ती जाण्यापूर्वी मला म्हणाली, हे रस्ते किती खराब आहेत. माझी पूर्ण पाठ दुखण्याने खिळखिळी झाली. आता ती हयात नाही, पण विठ्ठलाच्या कृपाने मी या रस्त्यांचे काम पूर्ण करू शकलो, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी-फलटण-नातेपुते-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत जात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामांचा आढावा घेतला. या पहाणी दरम्यान फलटण येथे पत्रकार परिषद घेत नितीन गडकरी यांनी नवीन विकास प्रकल्पांची घोषणा केली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या मार्गांची वैशिष्ट्ये आणि कामांचीही त्यांनी माहिती दिली.
मृत्यूपूर्वी नितीन गडकरी यांची आई पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोटच्या यात्रेला गेली होती. त्यावेळच्या खराब रस्त्यांचा प्रवास पाहून त्यांनी गडकरींना खराब रस्त्यांविषयी विचारले होते. हा प्रसंग सांगताना गडकरी म्हणाले, ‘माझ्या आईचा मृत्यू होण्यापूर्वी ती पंढरपूर आणि तिथून पुढे गाणगापूरला गेली होती. ती जाण्यापूर्वी मला म्हणाली की, हे रस्ते किती खराब आहेत. माझी पूर्ण पाठ दुखण्याने खिळखिळी झाली.’ यावर जर संधी मिळाली, तर मी अक्कलकोट-गाणगापूर आणि या भागातील रस्ते नक्कीच सुधारेन, असे आश्वासन आईला दिल्याचेही नितीन गडकरी यांनी नमूद केले.
आता ती हयात नाही, पण विठ्ठलाच्या आशीर्वादाने मला रस्ते वाहतूक मंत्री म्हणून संधी मिळाली आणि मी आईला दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. गाणगापूरकडे जाणाऱ्या खराब रस्त्यांविषयी बोलताना गडकरी म्हणाले, पंढरपूरहून गाणगापूरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्यावरून प्रवासाला सहा तास, सात तास लागायचे. तिथे अनेक अपघातही झाले होते.
ग्रीन-झोनची गरज
हा पालखी महामार्ग ग्रीन महामार्ग म्हणून विकसित करण्यासाठी आमदार-खासदार, शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी सरकारबरोबर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. झाडांचे संवर्धन असो, की नवीन झाड लावण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येकाला मदत करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्षारोपण, संवर्धन हीच काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
