पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेला ‘बिटुमिन’चा तुटवडा, वाढलेल्या किमती आणि मंत्रिमंडळ समित्यांच्या मंजुरीअभावी रखडलेल्या प्रकल्पांमुळे देशातील महामार्ग बांधणीचा वेग मंदावल्याची कबुली केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरी यांनी संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. या दरम्यान ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेला बिटुमिनचा तुटवडा आणि मंदावलेल्या महामार्ग बांधणीवरही भाष्य केले.
महामार्ग उभारणीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र, महामार्ग बांधणीचा वेग आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रतिदिन २५ किलोमीटरवर आला असून, त्यात सलग तीन वर्षांपासून घसरण होत असल्याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले, ‘प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये (एनएचएआय) तीन हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. आता निधीसाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवावा लागतो. त्यासाठी तीन ते चार समित्या असतात. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रकल्प मंजूर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे काही प्रमाणात महामार्ग बांधणीचा वेग मंदावला, हे खरे आहे. मात्र, हे सगळे प्रकल्प एकदम मंजूर होतील आणि महामार्ग बांधणीचा वेगही पूर्ववत होईल.’
बिटुमिनचा तुटवडा
युद्धामुळे बिटुमिनचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गांच्या कामाचा वेग संथ होण्याबरोबर रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्तीच्या कामांचा खर्च वाढत आहे. याबाबत गडकरी म्हणाले, ‘देशात महामार्ग विकासासाठी ११० लाख टन पेट्रोलियम बिटुमिनची गरज लागते. आता देशामध्ये बायो बिटुमिन बनविण्याला परवानगी देण्यात आली आहे. तांदूळ, कापूस आदी जैविक कचऱ्यापासून बिटुमिन निर्मितीसाठी संशोधन करण्यात आले. या संशोधनामुळे देशातील पहिला बायो बिटुमिनचा १ किलोमीटर लांबीचा रस्ता नागपूर ते जबलपूर महामार्गावर तयार झाला. युद्धामुळे बिटुमिनचा तुटवडा भासू लागला आहे.’
‘आता पेट्रोलियम बिटुमिनमध्ये ३० टक्के बायो बिटुमिन, सात टक्के प्लास्टिक आणि १५ टक्के वापरलेल्या रबर टायरची पावडर टाकायची, असे मिश्रण तयार करण्यासाठी रिफायनरीला दिले आहे. या मिश्रणाच्या चाचणीचे परिणाम आले असून, प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. या संशोधनामुळे देशात होत असलेली ६० लाख टन बिटुमिनची आयात थांबेल, त्याची किंमत कमी होईल आणि रस्त्यांची गुणवत्ताही सुधारेल. याचे तंत्रज्ञान विकण्याच्या सूचना भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेला (सीएसआयआर) दिल्या. त्यानुसार आतापर्यंत २५ लोकांना बायो बिटुमिन निर्मितीचे परवाने देण्यात आले आहेत. ते आता बायो बिटुमिन तयार करत आहेत. आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जादाता, इंधनदाता, बायो बिटुमिन दाता आणि हायड्रोजन दाता झाला आहे,’ असेही गडकरी यांनी नमूद केले.
महामार्ग बांधणीचा वेग
- आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रतिदिन ३४ किलोमीटर
- आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रतिदिन २९ किलोमीटर
- आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रतिदिन २५ किलोमीटर
बिटुमिनचे महत्त्व काय?
खनिज तेलाचे शुद्धीकरण करून पेट्रोल आणि डिझेल तयार करताना बिटुमिन हा काळ्या रंगाचा चिकट आणि जाडसर घटक तयार होतो. बिटुमिन हे पाणीरोधक, अतिशय चिकट आणि टिकाऊ असते. रस्त्यांच्या बांधणीत सर्व घटकांना एकसंध करणारा म्हणून बिटुमिन अतिशय महत्त्वाचे ठरते. बिटुमिन तापवून त्यात खडी आणि वाळू मिसळून डांबर तयार केले जाते. त्याचाच थर रस्त्यांवर टाकला जातो. त्यामुळे नवीन महामार्गांच्या उभारणीसह गल्लीबोळातील रस्त्यांच्या दुरुस्तीपर्यंत बिटुमिन गरजेचे असते.
