“मी चंद्रकांत दादांना म्हटलं, इथला प्रत्येक माणूस आपल्याला शिव्या देतोय”, पुण्यात बोलताना गडकरींनी सांगितला किस्सा!

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली.

Nitin-Gadkari2
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (संग्रहीत छायाचित्र)

कोणत्याही व्हीआयपीसाठी पोलिसांनी रस्ता अडवल्यामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याची उदाहणं आपण रोजच बघतो. राजकीय वर्तुळातील महत्त्वाची व्यक्ती रस्त्यावरून जात असताना त्यांच्या ताफ्यासाठी सामान्य माणसांना रस्ता बंद केला जातो. याविषयी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी सकाळीच घडलेला एक किस्सा सांगितला. तसेच, यावेळी बोलताना पुण्यात वाढलेल्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करतानाच अॅम्ब्युलन्सचा सायरन आणि गाड्यांचे हॉर्न बदलण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

“मला पुण्यात येताना एका गोष्टीचं नेहमी दु:ख होतं..”

“मला पुण्यात येताना एका गोष्टीचं नेहमी दु:ख होतं. माझी मोठी बहीण पुण्यात राहायची. मी लहानपणी पुण्यात फक्त यासाठी यायचो की पुण्यातली हवा खूप शुद्ध होती. पर्वतीवर जायचो. सुंदर हवा होती. हवा म्हणजे गोड पदार्थ खायचा आनंद मिळायचा. पण आताचं पुणं खूप प्रदूषित झालंय”, असं गडकरी म्हणाले. पण जल, वायू आणि ध्वनीप्रदूषणात सर्वाधित प्रदूषित असणाऱ्या शहरांत पुण्याचा क्रमांक लागतो, असं देखील ते म्हणाले.

पुण्यासाठी १४० किमी प्रतितास धावणारी बिनपैशांची मेट्रो? नितीन गडकरींनी सांगितलं गणित!

..तेव्हा कळलं आवाजामुळे किती त्रास होतो!

“मी वाहतूक मंत्री आहे. मी सगळ्या मंत्र्यांचे लाल दिवे काढून टाकले. आता पोलीस आणि अॅम्ब्युलन्सचेच आहेत. मला ध्वनीप्रदूषणाचं महत्त्व लक्षात आलेलं नव्हतं. मी नागपूरला ११व्या मजल्यावर राहतो. मी रोज सकाळी उठून तासभर प्राणायाम करतो. मला एवढे भोंगे वाजल्याचं ऐकायला येतं, तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की आवाजामुळे किती त्रास होतो. हवा, ध्वनी आणि जलप्रदूषणामुळे आपण हॉस्पिटलची बिलं भरतो. पण मी आता एक आदेश काढणार आहे. एक जर्मन व्हायोलिन वादक होता. त्याने आकाशवाणीची एक ट्यून तयार केली होती. सकाळी साडेपाचला ती वाजायची. मी ती ट्यून शोधलीये. मी म्हटल अॅम्ब्युलन्सवर ही ट्यून लावा. ती कानाला चांगली वाटते”, असं गडकरी म्हणाले.

मंत्र्यांसाठी सायरल आणि सलामी आकर्षणाचा विषय

दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मंत्र्यांना लाल दिव्याचं, वाजणाऱ्या सायरनचं आकर्षण असल्याचं सांगितलं. “मी तबला वाजवणारे, व्हायोलिनचा, बासरीचा हे हॉर्न तयार केले आहेत. भारतीय वाद्यांचे हॉर्न मी आता मर्सिडीजसह सगळ्यांना लावायला सांगितले आहेत. सायरन तर असा आहे की एखाद्याचे कान फुटावेत. मंत्र्यांना मोठी खुशी होते सायरन वाजला की. सायरन आणि सलामी हा मंत्र्यांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण मंत्रीपद गेल्यावर यातलं काही होत नाही”, असं गडकरी म्हणाले.

“मला सकाळी येताना फार वाईट वाटलं”

नितीन गडकरी पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी सकाळी घडलेला एक किस्सा त्यांनी सांगितला. “आज सकाळी मी रस्त्याने येताना मला फार वाईट वाटलं. सगळे रस्ते बंद केले होते. चंद्रकांत दादांना मी म्हटलं की आपल्याला बरं वाटतंय कारण ट्रॅफिक नाही. पण इथला प्रत्येक माणूस आपल्याला माय-बहिणीच्या शिव्या देतोय की यांनी रस्ता बंद केला. पण झेड प्लस सुरक्षा असल्याने त्यांच्या काही प्रोटोकॉल पद्धती असतात”, असं गडकरींनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nitin gadkari in pune speaks on road blocking for political vip pmw

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी