पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, पंढरपूरच्या वारीचा मार्ग जलद आणि सुखकर होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी सांगितले.

पालखी महामार्गाच्या पाहणीनंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट ते हडपसर या सहा टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील चार टप्पे पूर्ण झाले असून, धरमपूरी ते लोणंद या टप्प्याचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, दिवेघाट ते हडपसर या टप्प्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.’

‘वन विभागाच्या १७ हेक्टर जमिनीवर दिवेघाट ते हडपसर दरम्यानचा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवाने लवकर न मिळाल्यामुळे या मार्गाचे काम रखडले होते. आता यावर्षी डिसेंबरपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत असून, पाटस ते बारामती मार्ग पूर्ण झाला आहे. तर बारामती ते इंदापूर टप्प्याचे ८४ टक्के आणि इंदापूर ते तोंडले टप्प्याचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर यांसह आवश्यक त्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आहेत,’ असेही गडकरी त्यांनी नमूद केले.

महामार्गाची वैशिष्ट्ये

– पालखी मार्गाचे चौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची सोय.

– प्रकल्पादरम्यान ४३ तलावांचे खोलीकरण करण्यात आले असून, तेथील मुरुम, माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली.

– रस्त्यात येणाऱ्या सुमारे १ हजार २०० झाडांचे पुनर्रोपन, तर ४० हजार झाडे रस्त्याच्या दुतर्फा नव्याने लावण्यात येणार आहेत.

– आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महामार्गावरील येणाऱ्या अहिल्या विहीर आणि बाजीराव विहीर या दोन ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यात आले आहे.

– काही ठिकाणी तीन चाकी गाड्या आणि स्कूटरही चढू शकतील असे पादचारी पूल बनवायची योजना आहे.

नव्या प्रकल्पांची घोषणा

– जेजुरीत २ किमी लांबीचा उड्डाणपूल. त्यासाठी २५० कोटी रुपये तरतुद

– फलटण शहरात रस्ते रुंदीकरणासाठी ९७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी

– नीरा रस्त्यावर ७२ मीटरओ लांबीचा रेल्वे ओव्हर ब्रीज

– टेंभूर्णी-पंढरपूर दरम्यान साडेनऊ किलोमीटर लांबीचा पंढरपूर बायपास. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड होणार – दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात, त्या तोंडले गावात उड्डाणपुल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद