पुणे : ‘राज्य सरकारने मिसिंग लिंकचे काम केले आहे. पण, त्यावर खड्डे पडले म्हणून समाजमाध्यमांवरून माझ्यावरच टीका करण्यात आली. पर्यावरण विभागाने परवानगी दिली नव्हती, म्हणून मला मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम करता आले नाही,’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली
‘सध्या समाजमाध्यमांमुळे कामे कोणत्या दर्जाची होतात, त्यासाठीची जबाबदारी कोणाची, हे लगेचच कळते,’ अशी टिपण्णीही त्यांनी या वेळी केली. लवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. त्यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध’ या विषयावर भाष्य केले. कार्यक्रमाला सिम्बायोसिस विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. एम. एस. शेजूळ आदी उपस्थित होते.
‘मिसिंग लिंक’च्या कामांवरून होत असलेल्या टीकेला गडकरींनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंक राज्य सरकारने बांधला आहे. त्यामुळे माझा या मार्गाशी सबंध नाही. मात्र, पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे सोशल मिडीयावर नागरिकांनी मलाच प्रश्न विचारले.’ माझ्या कार्यकाळात मिसिंग लिंकचे काम करण्यासाठी पर्यावरण विभागाची मिळाली नव्हती. त्यामुळे मला या रस्त्याचे काम करता आले नाही, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
नवीन मुंबई-पुणे महामार्ग
‘नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचेही काम करण्यात येत आहे. नुकतीच पागोटे चौकापर्यंतच्या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण करणे शक्य होईल,’ असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या रस्ते जाळ्याच्या विस्ताराबाबत बोलताना गडकरी म्हणाले, ‘अटल सेतू ते पागोटे चौक आणि तिथून पुढे पुण्यापर्यंत एक नवीन रस्ता विकसित केला जात आहे. या मार्गावरून पुढे बंगळुरूपर्यंत अवघ्या पाच तासांत पोहोचता येईल अशी व्यवस्था उभारली जात आहे. तसेच शिळफाटा ते पनवेल आणि जुन्या पुणे-मुंबई हायवेच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, त्यासाठीही भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.’ तसेच मुंबई ते बंगळुरू हा प्रवास पाच तासात होईल, असे रस्ते उभारण्यात येत असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.
‘पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासात’
‘पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत करता येणार आहे. त्यासाठी सहापदरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे नागपूरपर्यंतचा प्रवास अत्यंत जलद आणि सुलभ होणार असून त्यासाठी विमानाचीही गरज लागणार नाही,’ असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
