पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करत बसमधून प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गाती पहाणी केली. पण, फलटणनंतर गडकरींच्या बसच्या पुढे-मागे गाड्यांची संख्या वाढली आणि ताफ्यात अचानक ३०-४० गाडी असल्याचे समोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर नितीन गडकरी यांनी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली. गडकरी यांनी पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी-फलटण-नातेपुते-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी पत्रकारांबरोबच बसमधून केली. या पाहणी दरम्यान फलटणमध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेला माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर आलेले. त्यांनी गडकरी यांची भेट घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर या महामार्गावर आणखी काही नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गांचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. सध्या प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली असून, येत्या काळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेनंतर नितीन गडकरी यांच्यासह खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर एकाच बसमधून प्रवासासाठी जाणार होते. त्यानुसार या तिघांचा ताफा ठरल्या नियोजनानुसार पंढरपूरकडे रवाना झाला. त्यावेळी गडकरी यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढून ३० ते ४० गाड्या बसच्या पुढे-मागे असल्याचे निर्दशनास आले. आता समाजमाध्यमांवरही या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मोहिते-निंबाळकरांमध्ये राजकीय चर्चा ?

नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेनंतर माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर गडकरी यांच्यासह एकाच बसमधून पंढरपूरकडे जाणार होते. दरम्यान, त्यांच्यात राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजीतसिंह निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीपासूनच मोहिते आणि निंबाळकर एकमेकांवर टिका करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र होते. आता नितीन गडकरींबरोबर धैर्यशिल मोहिते-पाटील आणि रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात झालेली भेट, चर्चेचा विषय ठरली आहे.