पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी (१४ मे) पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी-फलटण-नातेपुते-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामांची पाहणी केली. या पहाणी दरम्यान पत्रकार परिषद घेत गडकरी यांनी जेजुरीत नवीन उड्डाणपुल, फलटणमधील रस्त्यांचे रुंदीकरण, नीरा रस्त्यावर आरओबी, पंढरपूर बायपास आणि दोन्ही पालखी मार्ग एकत्र येतात त्या तोंडले गावात उड्डाणपूल, अशा विविध विकास प्रकल्पांची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेला माढ्याचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील आणि माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर या वेळी उपस्थित होते. पालखी मार्गाच्या पाहणीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास पत्रकारांबरोबरच बसमध्ये केला. दरम्यान, सुरवडी, फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी विविध विकासकामांची माहिती दिली.
सहा टप्प्यांमध्ये सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. आता या मार्गावर काही नवीन विशेष प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यात जेजुरीत दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल उभारण्यात येत असून, त्यासाठी २५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
फलटणमध्ये ९७ कोटींचे रस्ते प्रकल्प
फलटण शहरात वन टाईम इम्प्रूव्हमेंट तत्त्वावर रस्त्यांच्या विकासासाठी ९७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. फलटण शहरातील अरुंद रस्ते आणि राव रामोसे पुलाचे रुंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच पालखीच्या वेळी वारकऱ्यांनाही चालणे सोयीचे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
नीरा रस्त्यावर ७२ मीटर (Single Span) लांबीचा रेल्वे ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली. ते म्हणाले, या पुलामुळे रस्ता जोडला जाईल आणि सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल. टेंभूर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये साडेनऊ किलोमीटरचा पंढरपूर बाह्यवळण (बायपास) रस्ता करण्यात येणार आहे.
टेंभुर्णी-पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित या बायपासमुळे शिर्डी-अहिल्यानगर-टेंभुर्णी कडून येणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर-मंगळवेढा मार्गे शहराबाहेरून जाईल. अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होणार आहे. तसेच दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात, त्या तोंडले गावात उड्डाणपुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
