पुणे : शहराचा विस्तार वाढत असल्याने लोकसंख्येतही भर पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येत असून, जागोजागी कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ‘नवे पुणे’ विकसित करण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमामध्ये गडकरी बोलत होते. ‘पुण्यासह देशातील काही शहरांमध्ये लोकसंख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे. अन्यथा रस्ते आणि पूल कितीही बांधले, तरी भविष्यात रस्त्यावर चालणेही कठीण होईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांना वर्षभरात गती मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणातही घट होईल.’

‘प्रकल्पांची कामे करताना भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषांनुसार दोन खांबांमधील अंतर ३० मीटर असते; मात्र मलेशियातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पांमध्ये हे अंतर १२० मीटर ठेवले जाणार आहे. त्यामुळे खांबांची संख्या कमी होऊन प्रकल्पाचा खर्चही कमी होणार आहे. या मार्गांमध्ये तळाला सामान्य रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वांत वर मेट्रो मार्ग अशा त्रिस्तरीय रचनेचा अवलंब केला जाणार आहे,’ असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

आणखी एक पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग

‘पुणे–मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून, पहिल्या टप्प्याची निविदा तीन महिन्यांत काढली जाईल. ‘जेएनपीटी’कडे जाणाऱ्या रस्त्याला हा द्रुतगती मार्ग जोडण्यात येणार आहे. तसेच, ठाणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येईल. हा मार्ग अहिल्यानगरला जोडला जाणार आहे,’ अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादांची आठवण येते

पुणे शहराच्या चारी दिशांना महत्त्वाचे रस्ते आहेत. शहरात येणारे हे रस्ते मोठे व्हावेत आणि वाहतुकीची कोंडी सुटून वाहन चालकांना दिलासा मिळावा यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे नेहमी आग्रही असायचे. अहिल्यानगर, सोलापूर कडे तसेच तळेगाव ते शिरूर या रस्त्यांवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचा मोठा फायदा नागरिकांना होणार आहे. या कामासाठी जीएसटी मध्ये सवलत राज्य सरकारने द्यावी तसेच उड्डाणपूल उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट, वाळू, खडी यावरील करामध्ये दिलासा द्यावा अशी विनंती राज्य सरकार केली होती.

त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी यामध्ये पुढाकार घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय करून घेतला. आज्या तीनही प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित दादा पवारांची प्रकर्षाने आठवण येत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.