पुणे : ‘पुण्यात वाहतूककोंडी आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कोणाचीही येथे येण्याची इच्छा होत नाही,’ अशी खंत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ‘या समस्येतून मार्ग काढण्यासाठी येत्या दोन वर्षांत पुण्यात ६० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत,’ असे त्यांनी जाहीर केले.
सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, कुलसचिव डॉ. शेजूळ आदी या वेळी उपस्थित होते. ‘पुण्यातील प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून विशेष ‘इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग मॉडेल’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल,’ असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘पुण्यात बाहेरून येणाऱ्या आणि परराज्यांत जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. शहरावरील हा ताण कमी करण्यासाठी बाह्यवळण मार्ग उभारले जात आहेत. सूरत-नाशिक-अहिल्यानगर- सोलापूर-दक्षिण भारत कॉरिडॉरमुळे उत्तर भारत, गुजरातहून दक्षिण भारतात जाणाऱ्या वाहनांना मुंबई वा पुण्यात प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. ही वाहतूक सूरतवरून थेट नाशिक, अहिल्यानगर, सोलापूरमार्गे दक्षिण भारतात वळवली जाईल. त्यामुळे दिल्ली ते चेन्नई हे अंतर ३२० किलोमीटरने कमी होईल.
त्याशिवाय पुण्यातील जड वाहतूकही बाहेरून वळवली जाईल. ठाणे आणि शिळफाटा भागातून येणारी वाहतूकही पुण्यात न येता थेट अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे वळवण्यासाठी नव्या ‘लिंक रोड’चे नियोजन आहे.’‘नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचेही काम करण्यात येत आहे. नुकतीच पागोटे चौकापर्यंतच्या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण करणे शक्य होईल,’ असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख प्रकल्प
- पुणे-शिरूर उन्नत मार्ग : ७,५१५ कोटी रुपये (५३.४० किमी)
- हडपसर ते यवत उन्नत मार्ग : ५,२६५ कोटी रुपये (३१.६५ किमी)
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग : ४,००० कोटी रुपये (५४.२० किमी); मार्गाचे भूमिपूजन झाले असून, काम सुरू.
- शिरूर ते छत्रपती संभाजीनगर : १५,००० कोटी रुपये (१९२ किमी)
- खेड ते नाशिक फाटा एलिव्हेटेड मार्ग : ८,००० कोटी रुपये (३० किमी); मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण.
- रावेत ते नऱ्हे उन्नत कॉरिडॉर : ६,००० कोटी रुपये (३२ किमी)
