पुणे : ‘व्रतस्थ आणि व्यावसायिक ही पत्रकारितेची दोन अंगे आहेत. ‘फास्ट फूड’सारखे क्षणिक यश मिळणविणाऱ्यांपेक्षा देशाचा आणि समाजाचा विचार करणाऱ्या व्यक्तींचीच इतिहासात नोंद होते,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘एस. के. कुलकर्णी यांनी मान-सन्मान आणि आर्थिक लाभाची चिंता न करता विचारांशी प्रामाणिक राहून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्कारासाठी व्रतस्थ पत्रकारिता केली,’ असा गौरव त्यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कृतज्ञता सोहळ्या’त नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांचा पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. त्गडकरी बोलत होते. महापौर मंजूषा नागपुरे, संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्यवाह पांडुरंग सांडभोर या वेळी उपस्थित होते.
ग़डकरी म्हणाले, ‘एस. के. कुलकर्णी यांनी विचारमूल्यांशी कटिबद्धता ठेवून सत्य समाजापर्यंत पोहोचविण्याचा आणि जबाबदार, लोकाभिमुख आणि लोकशाहीला बळ देणारी पत्रकारांची पिढी घडवण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी माध्यमे हे लोकशिक्षण व लोकप्रबोधनाचे सर्वांत प्रभावी साधन आहे. याच विचारातून लोकशाहीचे रक्षण झाले पाहिजे, या कटिबद्धतेतून समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन घडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
‘ विश्वासार्हता हा पत्रकाराचा खरा दागिना आहे, हा विचार जपणाऱ्या एस. के. कुलकर्णी यांचा सन्मान हा पुणे शहराचा गौरव आहे,’ असे मंजूषा नागपुरे म्हणाल्या.
कुलकर्णी म्हणाले, ‘बदलत्या काळात पत्रकारितेपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. पत्रकारितेची भाषा बदलली की समाजाची भाषा बिघडते.अशा काळात पत्रकाराने जिद्दीने नावीन्यपूर्ण आणि वेगळी शैली आत्मसात करून स्वतःचा वैचारिक ठसा उमटविणे आणि लोकशिक्षणाचे कर्तव्यपालन करणे आवश्यक आहे.’ शेळके यांनी प्रास्ताविक केले. पाटील यांनी आभार मानले. सरवदे यांनी सूत्रसंचालन केले.
मतभिन्नता हे जिवंत लोकशाहीचे लक्षण असून, प्रामाणिक मतभेदांचा सन्मान केला पाहिजे; पण मनभेद असता कामा नयेत. मात्र, लोकशाहीत गुणात्मक उद्दिष्टपूर्तीसाठी निर्णयही झाले पाहिजेत. पुण्यात मेट्रो रस्त्यावरून न्यायची की भुयारी असावी, याबाबत खूप चर्चा झाल्या. शेवटी एका बैठकीत मी हात जोडून पुण्याच्या विद्वत्तेला नमस्कार केला आणि उद्यापासून काम सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यानंतर पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली.- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
